किरीट सोमय्या आणि 100 कोटी
X
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे आपल्या विरोधकांवर शेकडो कोटींच्या घोटाआळ्याचे आरोप करत असतात. पण आता सोमय्यांवर 100 कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध ठाण्याच्या कोर्टात 100 कोटी रुपयांच्या अब्रु नुकसानीचा खटला दाखल केला आहे.
"निराधार, बेछूट आणि बेजबाबदार आरोप करून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची बदनामी करण्याची मोहीम माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गेले काही महिने सुरु केली होती. किरीट सोमय्या यांनी खोट्या विधानांबाबत माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार" असे आमदार सरनाईक यांनी जाहीर केले होते. त्यानुसार किरीट सोमय्या यांच्या विरोधात ठाणे कोर्टात १०० कोटींचा विशेष दिवाणी दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी दाखल केला आहे.
आता सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबाबत कोर्टात उत्तर द्यावे लागणार आहे. मीरा भाईंदर मनपा क्षेत्रात पर्यावरणाचा ऱ्हास करून युवक प्रतिष्ठानच्या संचालिका मेधा किरीट सोमय्या यांनी किरीट सोमय्या यांच्या राजकीय वजनाचा वापर करून तब्बल १६ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम सीआरझेड व कांदळवन क्षेत्रात केले आहे, असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला होता. यानंतर त्याची चौकशी सुरू झाली. सोमय्या यांनी आपला शौचालय घोटाळा बाहेर निघाल्याने सोमय्या यांनी आपल्यावर खोटे आरोप करण्याची मालिका सुरू केली, असा आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
"सोमय्या यांनी गेल्या ६ महिन्यात वेगवेगळ्या पत्रकार परिषदेत धादांत खोटी वक्तव्ये व बदनामी केली आहे. त्यांनी जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. खोटी विधाने आणि बातम्यांमुळे माझ्या प्रतिमेला जो तडा गेला , माझ्या इभ्रतीला जे नुकसान पोहोचले आहे , त्या नुकसान भरपाईपोटी मी विशेष दिवाणी दावा दाखल केलेला आहे व दिवाणी दाव्याचे मूल्य रक्कम १०० कोटी इतके आकारलेले आहे" असे सरनाईक यांच्याकडून सांगण्यात आले.