पंतप्रधान मोदींची सभागृहात नक्कल, भास्कर जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांची खडाजंगी
X
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस अपेक्षेप्रमाणे वादळी ठरला. विरोधकांनी पेपर फुटी, नैसर्गित आपत्तीग्रस्तांना न मिळालेली मदत यावरुन सरकारला जाब विचारला. पण दुसरीकडे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याने विधानसभेत मोठा गदारोळ झाला. लॉकडाऊनच्या काळातील वीजबिलांचा मुद्दा भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांनी १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचा उल्लेख केला. यालाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली. यावरुन वाद सुरू असताना भास्कर जाधव यांनी या वादात उडी घेत नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. यावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्या भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली.
यावरुन वाद विकोपाला गेल्यानंतर भास्कर जाधव यांनी आपण आपले शब्द आणि नक्कल मागे घेतो असे सांगितले, पण यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. अखेर सभागृह काही वेळासाठी स्थगित करण्यात आले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामध्ये हस्तक्षेप करत कोणत्याही नेत्याचा अवमान सभागृहात होऊ नये अशी भूमिका मांडली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी सभागृहात माफी मागितली आणि या वादावर पडदा पडला.