एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी, शिवसेनेचा मोठा निर्णय
एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री पद स्वीकारल्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे.
X
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले होते. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने पत्रक जारी करत एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचे कारण देत त्यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र शिवसेनेने उध्दव ठाकरे यांच्या सहीने प्रसिध्द केले आहे. तसंच एकनाथ शिंदे यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे.
यावर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, उध्दव ठाकरे हे आमचे नेते आहेत. त्यांनी आमच्याविरोधात काहीही बोललं तरी आम्ही त्यांच्या विरोधात काही बोलणार नाही. तसंच त्यांनी आम्हाला बोलवलं तर आम्ही त्यांच्याकडे नक्की जाऊ, असंही केसरकर म्हणाले.
पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, जरी एकनाथ शिंदे यांचे नेतेपद काढले असले. तरी मुख्यमंत्री हे सभागृहाचे नेते असतात. ते राज्याचे नेते असतात. त्यामुळे त्यांच्याविरोधात कितीही डाव खेळले तरी आम्ही मागे हटणार नाही. याबरोबरच ते विधीमंडळाचे नेते असल्याने त्यांच्याकडील छोटं पद गेल्याने काही फरक पडणार नाही, असंही केसरकर म्हणाले.