शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं स्पष्ट
अनेक वर्षाची परंपरा असलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक हजेरी लावत असतात. मात्र यंदा शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
X
शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. मात्र महापालिका प्रशासनाने अजूनही परवानगी दिली नाही. त्यापार्श्वभुमीवर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले तर दसरा मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात येईल. त्यामुळे शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा शिंदे गटाकडून हायजॅक होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
तुम्ही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणार आहात का? असा प्रश्न पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला. त्यावर उत्तर देतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, दसरा मेळाव्याला अजून खूप वेळ आहे. मात्र तुम्हाला याबाबत लवकरच कळेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याबाबत तुम्हाला लवकरच कळेल, असं म्हणत शिवाजी पार्कवर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याचे सुतोवाच केल्याचे राजकीय विश्लेषक म्हणतात.
एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्री पद भुषवले. त्यानंतर शिवसेनेवर दावा करत आपणच खरी शिवसेना असल्याचे म्हटले. मात्र सध्या निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर शिंदे गटाकडून शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावाही हायजॅक करण्यात येणार का? अशी चर्चा रंगली आहे.