लफडी करायची तुम्ही आणि लपवायला पाठीत खंजीर खुपसायचा? आदित्य ठाकरे भडकले
आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या निष्ठायात्रेत पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला.
X
"ही बंडखोरी नसून गद्दारी आहे.तुमच्यावर दडपण असेल, तुमच्या काही फाईल्स उघडल्या असतील. पण घोटाळे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही आणि लपवायला कोणाच्या पाठीत खंजीर खुपसायचा तर पक्षप्रमुखांच्या," अशा शब्दात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर शिवसेना नेत्यांवर शरसंधान केलं आहे.
शिवसेना आमदार आणि खासदारांमध्ये फूट पडल्याने सध्या ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये खळबळ माजली आहे. त्यापासून युवा नेते आदित्य ठाकरे हे ठीक ठिकाणी जाऊन शिवसेना शाखांना भेट देऊन निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी दौरे करत आहेत.
"शिवसेनेशी गद्दारी करायची नंतर बोलायला मोकळे आम्ही हिंदुत्वासाठी गेलो, महाराष्ट्र धर्मासाठी गेलो. हे सगळं थोतांड आहे. त्यांना स्वत:ला वाचवायचं होतं म्हणून त्यांनी तुमच्याबरोबर, आमच्याबरोबर गद्दारी केलीय," असं आदित्य शिवसैनिकांसमोर दिलेल्या भाषणात म्हणाले.
ही बंडखोरी नसून गद्दारी असल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी या बंडखोर नेत्यांची वेगवेगळी प्रकरणं उघड झाल्याने त्यांनी शिवसेनेविरोधात भूमिका घेतल्याचा स्पष्ट आरोप केला. "तुमच्यावर दडपण असेल, तुमच्या काही फाईल्स उघडल्या असतील. पण घोटाळे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही आणि लपवायला कोणाच्या पाठीत खंजीर खुपसायचा तर पक्षप्रमुखांच्या," असं म्हणत आदित्य यांनी बंडखोरांना लक्ष्य केलंय.
बंडखोरांच्या सुरत गुवाहाटी गोवा दौऱ्यावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, "आपण दिल्लीसमोर जाऊन झुकतोय. दिल्लीकडे आपण (महाराष्ट्राच्या मदतीसाठी) काही पॅकेज मागत नाही, गुवाहाटीला, सुरतेला जाऊन मजा करता याला तुम्ही बंडखोरी तरी कशी म्हणता?" असा सवाल आदित्य यांनी उपस्थित केला.
शिवसेनेतील फुटनाट्यानंतर आता पुढील राजकीय नाट्य दिल्लीमध्ये घडत आहे. आज याच मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार असून, लोकसभेतील बारा खासदार शिंदे घाटाला मिळाल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधानसभेप्रमाणेच फुटीर गटाला मान्यता दिल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे.