गोव्यात काँग्रेसची इच्छा नसेल तर मग स्वबळावर लढू - संजय राऊत
X
राज्यात महाविकास आघाडी म्हणून सत्तेत एकत्र असलेले काँग्रेस आणि शिवसेना गोव्यात एकमेकांविरोधात लढण्याची शक्यता आहे. "गोव्यात आमचे आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत, जर काही मनाप्रमाणे नाही घडले तर आम्ही स्वबळावर लढू, काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. "एकत्र लढलो तर गोव्यात परिवरर्तन घडवू शकतो. सेनेसारखा हिंदू विचारांचा पक्ष आघाडीत असणं चांगलं आहे. भिन्न विचारांच्या पक्षांसोबत एकाचवेळी चर्चा नाही. गोव्यात महाविकास आघाडी असावी, जर काँग्रेसची इच्छा नसेल तर मग स्वबळावर लढू" असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. गोव्यात भाजपचे मंत्री व आमदाराने भाजप सोडला याचा अर्थ गोव्यात भाजप अभेद्य नाही. युपीतही भाजपच्या अनेक आमदारांनी सपात प्रवेश केलाय, याचा अर्थ हवामानाचा अंदाज काही लोकांना आला आहे, असा टोलाही देखील त्यांनी लगावला आहे.
लाटांचे तडाखे बसायला लागले आहेत, सध्या मंद लाटा आहेत पण त्या उसळू शकतात व जहाज हेलकावू घेऊन शकते, असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला आहे. शिवसेना उ. प्रदेशात ५० जागा लढवणार आहे असेही त्यांनी सांगितले. भाजप ओपिनियन पोलच्या माध्यमातून अफवा पसरवत आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. गोवा व युपीत परिवर्तन निश्चित आहे, असा दावा देखील त्यांनी केला.