शरद पवारांचा विधानपरिषद आमदार नियुक्तीवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला
X
विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेते शरद रणपिसे यांना सुनावले होते. 12 सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकार आग्रह धरत नाही. तुम्ही का आग्रह धरता, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेत्याला सुनावले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे खासदार गिरीश बापट आणि काँग्रेस नेते शरद रणपिसेही उपस्थित होते. कार्यक्रमानंतर रणपिसे यांनी राज्यपालांची भेट घेऊन 12 सदस्यांची नियुक्ती करण्याची विनंती केली. या सदस्यांना विधान परिषदेत येण्याचा मार्ग मोकळा करावा, असंही ते म्हणाले. त्यावर राज्यपालांनी रणपिसे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं.
अजित पवार माझ्याबरोबर आहेत. ते माझे मित्रं आहेत. ते इथेच आहेत. सरकार याबाबत आग्रह धरत नाहीत. तुम्ही का आग्रह धरता?, असा सवाल राज्यपालांनी केला. या विषयावर राज्य सरकारने पाठपुरावा केला पाहिजे, असं त्यांनी रणपिसेंना सांगितलं. यावर आज पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे.
राज्यपालांचे एक स्टेटमेंट पाहिले की, सरकारने १२ आमदारांबाबत संपर्क केला नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व नवाब मलिक यांनी पत्र दिले आहे. त्यामुळे त्यांच्या वयानुसार त्यांचे वक्तव्य आहे असे बोलतानाच शहाण्याला शब्दांचा मार अशी आपल्याकडे म्हण आहे. पण 'शहाण्याला' या शब्दावर जोर देत शरद पवार यांनी १२ आमदारांच्या विषयाबाबत आम्ही आता प्रतिक्रिया देण्याचेही टाळत आहोत. असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले.