Home > Politics > संजय राऊत यांचा इशारा, मार्क माय वर्ड

संजय राऊत यांचा इशारा, मार्क माय वर्ड

संजय राऊत यांचा इशारा, मार्क माय वर्ड
X

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड करत भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून संजय राऊत यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका सुरू आहे. त्यातच संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 ऑगस्ट पर्यंत दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांना कागदपत्रं जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मराठी माणसांच्या हृदयाला घरं पाडणारी घटना आहे. कारण ज्या मराठी माणसांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. त्या संघटनेवर फुटीरांनी खरी शिवसेना कुणाची यासाठी पुरावे देण्याची वेळ आणावी, यासारखं दुर्दैव काही नाही, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

तसेच तुम्ही फुटीर आहात. तुम्ही नव्याने चांगला संसार करा. मात्र दिल्लीश्वरांना बाळासाहेबांची शिवसेना संपवायची आहे. त्यासाठी त्यांचे हत्यार म्हणून महाराष्ट्राच्या विरोधात वापरलं जात आहे. उध्दव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहोत. ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ केला आहे. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीशी खंजीर खुपसलं आहे. त्यांना वेळ आणि महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

सीमाप्रश्नासाठी मेलेले 69 हुतात्मे हा शिवसेना आमची असल्याचा पुरावा आहे. 92 च्या दंगलीत माझ्यासह अनेकांवर गुन्हे दाखल झाले हा पुरावा आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. महाराष्ट्राच्या मातीच्या कणात आणि मराठी माणसाच्या मनात शिवसेना आहे. तसेच दहा वीस लोक फुटले तर हा पुरावा होऊ शकत नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. तसेच लोकसभा अध्यक्षांना विनायक राऊत यांनी तीन वेळा पत्र देऊनही त्यांनी त्याची दखल घेतली नाही. मात्र फुटीर गट गेला आणि आमची शिवसेना खरी असल्याचा दावा करतो. त्यामुळे त्यांना लगेच परवानगी मिळते, असा आरोप विनायक राऊत यांनी केला. ज्यांनी दिल्लीच्या आदेशाने ही वेळ आणली आहे. त्यांना वरून बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा पाहतो आहे. त्यामुळे या मातीत तुम्ही खतम व्हाल आणि आज तुम्ही घोड्यावर बसले आहात. घोड्यावरून फिरत आहात. तर मार्क माय वर्ड लोक उद्या तुमची गाढवावरून धिंड काढतील, असा इशारा संजय राऊत यांनी केला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात नाही. तर हे फक्त दोघांचे मंत्रीमंडळ आहे. त्यामुळे यांनी घेतलेले मोठे निर्णय बेकायदेशीर आहेत. तसेच महाराष्ट्राच्या जनतेचा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ज्यांनी दगा दिला त्यांची तिरडीही उठते, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

तुम्ही सांगता उठाव केला. पण त्या उठावा मधला उठ हा बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. तो तुम्हाला उठवल्याशिवाय राहणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले. आयोध्यात जा वाराणसीला जा काशीला जा कुठेही जा पण शिवसेनेच्या हिंदुत्वाची मशाल ही कायम तेजाने तळपत राहील उद्धवजी यांची लवकरच मुलाखत होईल आणि ती सामनामध्ये प्रकाशित होईल. जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत त्याला उत्तर दिलं जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

Updated : 23 July 2022 1:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top