अमरावती दंगल, भाजपने काड्या करु नये- संजय राऊत
X
अमरावती झालेली जातीय दंगल थांबली आहे, त्यामुळे आता कुणीही तिथे जाऊन काड्या करु नये असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. रझा अकादमीवर बंदी घालणार का असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अमरावतीमध्ये केला होता, त्यावर सरकारमध्ये असताना तुम्ही बंदी का नाही घातली, असा प्रतिसवाल संजय राऊत यांनी केला आहे. अमरावतीमध्ये दंगल कोणी पेटवली आहे हे देशातील जनतेला माहीत आहे. त्यामुळे आता वातावरण शांत झाले आहे, कुणीही काड्या करु नये असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पण याचवेळी दंगलीबाबत राज्याची गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्याची कबुलीही त्यांनी दिली. पण तेही माणसं आहेत, गुप्तचर यंत्रणा ही काश्मीर, चीन, गाझीपुर बॉर्डर आणि इतर ठिकाणी सुद्धा फेल झाली होती. अमरावतीतही फेल झाली पण नंतर परिस्थिती नियंत्रणात आणली गेली, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. केवळ हिंदूंवर गुन्हे दाखल होतात असे नाही तर भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल झाले म्हणजे हिंदूंवर गुन्हे दाखल झाले असे म्हणता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. भाजपचे आंदोलन हे राजकीय पोळी शेकण्यासाठी करत आहे. त्यांनी आगीत तेल ओतण्याचे काम करू नये. आंदोलन करायचं तर अमरावतीत शांतता राखण्यासाठी करावं, असेही आवाहन त्यांनी केले आहे.