झंडूबाम घेऊन ठेवा, संभाजी ब्रिगेडचा चंद्रशेखर बावनकुळे यांना इशारा
शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली होती. त्यावरून संभाजी ब्रिगेडने थेट चंद्रशेखर बावनकुळे यांना इशारा दिला आहे.
X
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यातच शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्यानंतर या युतीचा फायदा कुणाला होईल? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीवरून उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला संभाजी ब्रिगेडने प्रत्युत्तर दिले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवरून उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले होते की, उध्दव ठाकरे यांचा बार फुसका आहे. कारण 2019 च्या निवडणूकीत संभाजी ब्रिगेडने 40 उमेदवार उभे केले होते. त्याना 0.06 टक्के मतं मिळाली होती. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्यासोबत युती करायला कुणीही तयार नाही, म्हणूनच त्यांनी फुसका बार फोडला असल्याचे म्हटले होते. त्याला संभाजी ब्रिगेडने प्रत्युत्तर दिले आहे.
संभाजी ब्रिगेडने चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्युत्तर देतांना म्हटले आहे की, बावनकुळे साहेब तुम्हाला पोटशूळ उठलाय का? तुम्हाला संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीची एवढी भीती वाटतेय का? तुम्ही झंडूबाम घेऊन ठेवा. कारण त्यामुळे तुम्हाला शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीचा त्रास होणार नाही, असा खोचक टोला लगावला.
लोकांच्या न्याय आणि हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरून लढा देऊ तेव्हा तुमच्या जातीयवादी आणि मनुवादी विचारांचा बाजार उठल्याशिवाय राहणार नाही, असंही संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे म्हणाले.