Home > Politics > " तर भगवा ध्वज भविष्यात राष्ट्रध्वज बनू शकतो"; भाजपा मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

" तर भगवा ध्वज भविष्यात राष्ट्रध्वज बनू शकतो"; भाजपा मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

 तर भगवा ध्वज भविष्यात राष्ट्रध्वज बनू शकतो; भाजपा मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य
X

अयोध्येत राममंदिर बांधणार असे आम्ही म्हणत होतो, तेव्हा लोक हसायचे. आता आपण ते बांधत आहोत ना? भविष्यात भगवा ध्वज कधीतरी राष्ट्रध्वज बनू शकतो. मात्र, तिरंगा हा आता राष्ट्रध्वज असून, त्याचा सर्वांनी आदर केला पाहिजे, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री केएस ईश्वरप्पा यांनी केला आहे.

कर्नाटकात एका महाविद्यालयातून हिजाबवरुन सुरु झालेला वाद संपूर्ण राज्यात पसरला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात भगवा ध्वज फडकवला होता. त्यावर उत्तर म्हणुन काही विद्यार्थ्यांनी तिरंग फडकावला होता. या वादावर बोलताना केएस ईश्वरप्पा यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

शेकडो वर्षांपूर्वी श्री रामचंद्र आणि मारुतीच्या रथांवर भगवे झेंडे होते. तेव्हा आपल्या देशात तिरंगा ध्वज होता का? आता तो (तिरंगा) आपला राष्ट्रध्वज म्हणून निश्चित झाला आहे, त्याचा मान राखला गेला पाहिजे, यात प्रश्नच नाही, असेही मंत्री के एस ईश्वरप्पा म्हणाले.

लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवता येईल का, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, "आज नाही तर भविष्यात कधीतरी. आज देशात 'हिंदू विचार' आणि 'हिंदुत्वा'ची चर्चा होत आहे. अयोध्येत राममंदिर बांधणार असे आम्ही म्हणत होतो, तेव्हा लोक हसायचे. आता आपण ते बांधत आहोत ना? त्याचप्रमाणे भविष्यात कधीतरी १००,२००,५०० वर्षांनी भगवा ध्वज राष्ट्रध्वज होईल. तिरंग्याला आता घटनात्मकदृष्ट्या राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळाली आहे, त्याचा आदर केला पाहिजे आणि जो त्याचा आदर करणार नाही ते देशद्रोही ठरतील," असे ईश्वरप्पा यांनी म्हटले.

शिवमोग्गा येथील शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयात मंगळवारी हिजाबविरोधी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी तिरंग्याऐवजी भगवा ध्वज फडकवल्याच्या राज्य काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या दाव्याला ईश्वरप्पा उत्तर देत होते. शिवकुमार यांचे दावे खोटे असल्याचे सांगत ईश्वरप्पा यांनी हा हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. "डीके शिवकुमार खोटारडे आहेत. होय, तेथे भगवा ध्वज फडकावला गेला, पण राष्ट्रध्वज खाली उतरवला गेला नाही. भगवा ध्वज कुठेही फडकवता येईल, पण राष्ट्रध्वज खाली करून तसे झाले नाही आणि कधीच होणारही नाही," असे ईश्वरप्पा यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले.

Updated : 10 Feb 2022 11:23 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top