नाराज नाही, मात्र घटकपक्षांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा- सदाभाऊ खोत
राज्यातील नव्या मंत्रीमंडळात कोणत्याही घटकपक्षाला संधी न दिल्याने घटकपक्ष नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र भाजपचे सहयोगी पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
X
राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाचे घटकपक्ष नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर स्पष्टीकरण देतांना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी घटकपक्ष भाजपवर नाराज नाहीत. मात्र घटक पक्षांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा असल्याचे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्यात सत्तापरिवर्तन व्हावं, अशी राज्यातील जनतेची इच्छा होती. त्यानुसार राज्यत सत्तापरिवर्तन झाले आहे. त्याबरोबरच नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधीही झाला आहे. मात्र या मंत्रीमंडळात घटकपक्षांना संधी दिली नसली तरीसुध्दा घटकपक्षांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे. कारण राज्यातील घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला केंद्रात मंत्रीपद देण्यात आलं आहे. तसेच गेल्या सरकारमध्येही आम्हाला मंत्रीपदं देण्यात आले होते. त्यामुळे आम्ही नाराज असल्याच्या वावड्या उडवल्या जात असल्या तरी आम्ही नाराज नाही. मात्र सर्व घटकपक्षांना फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत. तर राज्यात स्थापन झालेल्या नव्या मंत्रीमंडळाने राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवावेत यासाठी सदाभाऊ खोत यांनी शुभेच्छा दिल्या.