मी सत्तेच्या खुर्चीवर बसणार नाही, राज ठाकरे यांचा उध्दव ठाकरे यांना टोला
राज्यात उध्दव ठाकरे विरुध्द एकनाथ शिंदे यांच्या गटात वाद सुरू असतानाच राज ठाकरे यांनी महत्वाची घोषणा करत उध्दव ठाकरे यांना टोला लगावला.
X
राज्यात शिंदे गट विरुध्द ठाकरे गट संघर्ष टोकाला गेला आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे शिंदे-फडणवीस यांच्यासोबत युती करण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यापार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बोलताना स्वबळाचा नारा देत उध्दव ठाकरे यांना टोला लगावला.
राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत स्वबळावर निवडणूकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्याच्या राजकारणाला लोक कंटाळले असून यापुढे आपण पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो, असं सांगतानाच निवडणूकीसाठी पैसा उभा करू, असंही राज ठाकरे म्हणाले.
सत्ता आली तर सत्तेच्या खुर्चीवर मी उडी मारून बसणार नाही तर तुम्हाला बसवणार असं म्हणत राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. त्याबरोबरच राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना 6 M चा पर्याय सूचवला. यामध्ये राज ठाकरे म्हणाले की, पदाधिकाऱ्यांनी मेसेज, मेसेंजर, मनी, मसल, माईंड आणि मेकॅनिक्स यांचा वापर करण्यास सांगतले.
राज ठाकरे यांनी यावेळी दसरा मेळाव्यावरूनही निशाणा साधला. ते म्हणाले की, दसरा मेळावा लोकांनी ऐकलाच नाही. तिथं फक्त चिखलफेक सुरु होती. कोणी विचार मांडले नाहीत. त्यामुळे सकारात्मक हिंदूत्वाचे विचार लोकांपर्यंत पोहचवा, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.