Home > Politics > खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया
X

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांनी ट्विट करून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकातील कोलार येथे सभेत बोलताना राहुल गांधी यांनी सगळे मोदी चोर कसे असं वक्तव्य केले होते. त्या प्रकरणी सुरत मध्ये गुन्हा दखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. मात्र खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करून आपली भावना व्यक्त केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मी भारताच्या अवाजासाठी लढत आहे. त्यामुळे मी कोणतीही किंमत चुकवायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी ट्विट करून दिली आहे.

काय आहे प्रकरण?

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटक मधील कोलार येथे बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यामध्ये राहुल गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे नाव मोदी कसे असते. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी अशी नावं घेतली होती.

देशात आणखी शोध घेतला तर अनेक ललित मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी सापडतील. यावेळी राहुल गांधी यांनी नीरव मोदी, मेहुल चोक्सी, ललित मोदी, अनिल अंबानी आणि नरेंद्र मोदी हे चोर असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून सुरत पश्चिमचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यामध्ये राहुल गांधी यांच्यावर कलम ४९९ आणि ५०० (मानहानीचा खटला) खटला दाखल केला होता. याप्रकरणी राहुल गांधी तीन वेळा न्यायालयासमोर हजर राहिले. यात २०२१ मध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान मी निर्दोष असल्याचं राहुल गांधी म्हणाले होते.

काय होता आरोप?

राहुल गांधी यांनी आमच्या पूर्ण मोदी समाजाचा अपमान केल्याचा आरोप पुर्णेश मोदी यांनी केला होता. यानुसार न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर आज लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यासंदर्भातील पत्र लोकसभा सचिवालयाने जारी केले. त्यानंतर देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

कोणत्या नियमानुसार राहुल गांधी यांची खासदारकी झाली रद्द?

सर्वोच्च न्यायालयाने १३ जुलै २०१३ रोजी लिली थॉमस प्रकरणात दिलेल्या निकालानुसार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. लिली थॉमस प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. त्यामध्ये कोणताही लोकप्रतिनिधी एखाद्या गुन्ह्यात दोषी आढळला आणि त्याला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्या सदस्याचे सदस्यत्व रद्द केले जाते. एवढंच नाही तर शिक्षा पूर्ण केल्यानंतर संबंधित सदस्याला पुढील सहा वर्षे निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे लिली थॉमस प्रकरणाचा संदर्भ देऊन राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

Updated : 24 March 2023 7:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top