गैर भाजप सरकार स्थापन करण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितला पर्याय
काँग्रेस अध्यपदाची धुरा स्वीकारल्यानंतर प्रथमच मल्लिकार्जुन खर्गे हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.
X
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun kharge) हैद्राबादमध्ये दाखल झाले. यावेळी मल्लिकार्जून खर्गे यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. देशात गैर भाजप सरकार (Non BJP government) स्थापन करायचं असेल तर फक्त राहुल गांधी यांच्या नेतृत्वातच शक्य आहे, असं वक्तव्य मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.
खर्गे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (Telngana CM KCR) यांच्यावरही टीकास्र सोडले. यावेळी बोलताना खर्गे म्हणाले की, केसीआर एकीकडे गैर भाजप सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र ज्यावेळी संसदेत काँग्रेस (Congress) एखाद्या विधेयकाला विरोध करते, त्यावेळी नेमकी उलट भूमिका केसीआर घेतात. त्यामुळे देशात गैर भाजप सरकार स्थापन करायचे असेल तर ते फक्त राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील सरकार असेल असं वक्तव्य खर्गे यांनी केले.
राहुल गांधी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर टीका केली. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, केसीआर हे पंतप्रधान मोदी यांच्या थेट संपर्कात असतात. त्यामुळे पंतप्रधान मोदी (PM Modi) हे केसीआर यांना फोनवरून आदेश देतात, असंही राहुल गांधी म्हणाले. केसीआर फक्त भाजप विरोधक असल्याचे नाटक करतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.