प्रविण दरेकर अडचणीत...मजूर संस्थेच्या तपासणीचे आदेश
X
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी मुंबै जिल्हा बँक निवडणूकीत मजूर गटातून निवडणूकीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर मजूर गटातून दरेकर यांना अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर सहकार विभागाने प्रविण दरेकर यांच्या प्रतिज्ञा मजूर संस्थेच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रविण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
गेली अनेक वर्षे भाजपा आमदार प्रविण दरेकर हे मुंबै जिल्हा बँक निवडणूकीत मजूर गटातून निवडून येत जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भुषवत आहेत. तर मजूर म्हणजे अंगमेहनतीची कामे करून मजूरी करणारी व्यक्ती. त्यामुळे प्रविण दरेकर कोणत्या अनुषंगाने मजूर गटात मोडतात, असा प्रश्न आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी विचारत दरेकर यांची चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान प्रविण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवत असल्याचे आदेश सहकार विभागाने दिले.
प्रविण दरेकर यांच्या संस्थेने केलेल्या कामांसोबतच त्यांच्या संस्थेत काम करणाऱ्या मजूरांचा व त्यांनी केलेल्या मजूरीचा तपशील सहकार विभागाच्या चौकशीत तपासण्यात येणार आहे. तर प्रविण दरेकर हे 1997 पासून प्रतिज्ञा मजूर संस्थेचे सदस्य आहेत. परंतू प्रविण दरेकर मजूर होऊ शकत नाहीत, असा आक्षेप धनंजय शिंदे यांनी घेतला. त्यामुळे विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी प्रतिज्ञा मजूर संस्थेच्या तपासणीचे आदेश जारी केले. तर ए विभागाचे सहनिबंधक प्रशांत सातपुते यांनी या प्रकरणात अहवाल सादर करण्याचे आदेश बाजीराव शिंदे यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार प्रविण दरेकर यांच्या प्रतिज्ञा मजूर संस्थेची तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार संस्थेची सर्व कागदपत्रे घेऊन मजूर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आले होते. परंतू ते यावेळी उपस्थित राहिले नाहीत. मात्र संस्थेचे दफ्तर सहनिबंधक प्रशांत सातपुते यांच्याकडे सुपुर्द केले होते. त्याल कागदपत्रात आढळलेल्या माहितीनुसार प्रविण दरेकर हे1997 पासून या संस्थेचे सदस्य आहेत. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची मजूरी केल्याचे आढळून आलेले नाही.याबरोबरच काही कागदपत्रे 2005 च्या पुरात वाहून गेल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता या कागदपत्रांच्या आधारे तपास करून अहवाल सादर केला जाणार आहे.
प्रविण दरेकर यांच्या संस्थेकडून सहकारी अधिनियमातील तरतूदींचे पालन झाले आहे का? याचीही चौकशी करण्यात येणार आहे. तसेच गेल्या दहा वर्षात दरेकर यांनी कोठे मजूर म्हणून काम केले, त्याची मजूरी चेकद्वारे कोठे जमा झाली? याचीही माहिती गोळा करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या मजूर संस्थेतील इतरांनीही कोठे मजूरी केली त्याचीही सत्यता पडताळण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबै जिल्हा बँकेवर प्रविण दरेकर यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. तर दरेकर यांच्या सहकार पॅनलने यंदा 21 पैकी 21 जागा खिशात टाकत एकहाती विजय मिळवला. मात्र प्रविण दरेकर यांना सहकार विभागाने अपात्र ठरवल्याने प्रविण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.