NIA ने टाकलेल्या धाडीत देशविरोधी कारवायांची किती कागदपत्रे मिळाली, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
X
देशभरात विविध ठिकाणी NIA ने PFI च्या कार्यालयांवर छापेमारी केली. त्यावर सवाल उपस्थित करत या धाडींमध्ये देशविरोधी किती कागदपत्रे मिळाली, हे 24 तासात जनतेसमोर मांडण्याचे आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, सकाळपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात आणि देशभरात विविध ठिकाणी मुस्लिम संघटनांवर धाडी टाकल्या. तपास यंत्रणांचा धाडी टाकण्याचा त्यांचा अधिकार आम्ही मान्य करतो. पण आपण का टाकल्या? आपल्याकडे यांच्याविरोधात काय होतं? आणि आपण जे कागदपत्र गोळा केलेले आहेत, त्यात किती निधी मिळाला? देशविरोधी कारवायांचे किती कागदपत्रे मिळाले? हे या यंत्रणांनी येत्या २४ तासात लोकांसमोर मांडावं. असे आवाहन केंद्रीय तपास यंत्रणांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, तपास यंत्रणांना २४ तासात हे मांडता आलं नाही, तर सामान्य माणूस हेच लक्षात घेईल की, भाजपचा जो मुस्लिम विरोधी अजेंडा आहे. तो पुढे करण्याकरिताच या धाडी टाकण्यात आल्या आहेत आणि जर असे असेल तर वंचित बहुजन आघाडी या धाडींचा निषेध करते. असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.