#Rajyasabha निवडणुकीवरून राज्यात पॉलिटिकल टेन्शन
X
#राज्यसभा(rajyasabha) निवडणुकीच्या निमित्ताने सुरु झालेल्या राजकारणाचा अंक आता अंतिम टप्प्यात येऊन पोचला असून सातव्या उमेदवारांमुळे निर्माण झालेला राजकीय संघर्ष अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी अती तीव्र झाला आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीची सुंदोपसुंदी वाढत असतानाच आता थेट शिवसेना-भाजपमध्ये सामना रंगणार असल्याचं चित्र निर्माण झालंय. आज दुपारी 3 वाजता राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली असल्यानं आता राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात थेट लढत होणार आहे. शिवसेनेनं दोन, काँग्रेसनं एक, राष्ट्रवादीनं एक आणि भाजपनं तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा केला आहे.
महाविकास आघाडीचे नेते आज देवेंद्र फडणवीस आणि मी तासभर चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव असा होता, तुम्ही राज्यसभेची तिसरी जागा मागे घ्या आणि आम्ही विधान परिषदेची एक जागा तुम्हाला जास्त देऊ. आमचा प्रस्ताव असा होता की, तुम्ही राज्यसभेसाठीची दुसरी जागा मागे घ्या, मग विधान परिषदेची पाचवी जागा आम्ही लढवणार नाही. त्यानंतर म्हणजे नंतर कुठलाच संवाद महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये झाला नाही. वेगवेगळ्या बातम्या फक्त कानावर येत राहिल्या. अधिकृतपणे कोणीही बोललं नाही आणि आता 3 वाजले, त्यामुळे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. भारतीय जनता पार्टी ही तिसरी जागा 100 टक्के लढवणार असून, ती जिंकेल, असा विश्वासही चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलाय. त्यामुळे या राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणुकीचा जोर वाढणार आहे. दगाफटका टाळण्यासाठी आता मविआने आमदारांना मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये येऊन राहण्य़ाचे आदेश दिले आहेत. ८ ते १० जून या काळात या आमदारांना हॉटेलमध्ये राहण्यास सांगितलं आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अपक्ष आमदारांची बैठक बोलावली आहे, ६ जूनला मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे.