#MVACrises पक्षात या मगच सरकार स्थापन करू, भाजपची एकनाथ शिंदेंसमोर अट?", प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली शक्यता
X
राज्यातील अभूतपूर्व राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक वेगळीच शक्यता वर्तवली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केला आहे. एकनाथ शिदे यांना भाजपमध्या येण्याची अट टाकली आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
विधान परिषद निवडणूक निकालानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडून आल्या. शिवसेनेतील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदार आणि मंत्र्यांना सोबत घेऊन बंडाचे निशाण फडकावले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले. आघाडीतील घटक पक्षा कडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ऑनलाइन भाषणाचे कौतुक केले. राज्याच्या सर्व राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त करताना बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे ?
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 23, 2022
"एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे?", असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
दरम्यान गुवाहटी येथे असलेल्या बंडखोर शिवसेना आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभा उपाध्यक्ष यांना पत्र पाठवून त्यांच्या स्वतंत्र गटाची घोषणा केली आहे. आज महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेऊन राज्यपालांना पत्र पाठवण्याचे शिंदे गटाकडून ठरत असल्याचे समजत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानावरुन मातोश्रीकडे प्रस्थान केल्याने शिवसेनेमध्ये सहानुभूतीची लाट तयार झाली आहे. महा विकास आघाडी आणि भाजपच्या पोटामध्ये बैठकांचे सत्र सुरू असल्याने आगामी राजकीय समीकरणं काय वळण घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.