BHR पतसंस्था घोटाळ्यात भाजप आमदाराचं कनेक्शन ?
X
BHR मल्टिस्टेट पतसंस्थेच्या अकराशे कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर यांच्या अटकेनंतर अनेक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या सुनील झंवरकडून पोलिसांना मिळालेल्या हार्डडिस्क आणि डायरीमध्ये भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना कोट्यवधी रुपये दिल्याचा उल्लेख आहे. झंवर आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांनी तसेच सरकारी वकीलांनी पुणे न्यायालयात माहिती दिली आहे. जप्त केलेल्या हार्डडिस्कमधून ही माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आमदारांना ६ कोटी?
मुख्य संशयित सुनील झंवर यांना पुणे न्यायालयाने 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिला आहे. आता सुनील झंवर पोलिसांना चौकशीमध्ये आणखी कोणकोणती माहिती देणार, कोणते खुलासे करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. नऊ महिन्यांपूर्वी पुणे आर्थिक शाखेच्या पथकाने सुनील झंवर यांच्या कार्यालयात छापा टाकून अनेक महत्वपूर्ण कागदपत्रं, सरकारी शिक्के, आमदार तसेच मंत्र्यांचे लेटरपॅड जप्त केले होते. त्यात एक डायरी आणि हार्डडिस्क सापडली होती .या डायरीत कोट्यवधी रुपयांची देवाण घेवाण झाल्याचा उल्लेख आहे. डायरीच्या एका कागदावर आमदार मंगेश चव्हाण यांना एक कोटी 55 लाख रुपये तर दुसऱ्या नोंदीत चार कोटी 50 लाख दिल्याची नोंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे डायरीच्या आणखी काही पानांवर अनेक बड्या राजकीय नेत्यांना पैसे दिल्याच्या नोंदी आहेत. ते पैसे कुठून आले, कसे आले आणि कोणाला दिलेत याचा तपास आता पुणे आर्थिक गुन्हे शाखा करणार असल्याचे सांगितले जाते आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे आर्थिक गुन्हे शाखेने नेमका काय तपास केला याची माहितीही आमदार चव्हाण यांनी मागितली होती, आवश्यक ती माहिती पोलिसांनीही दिली, मात्र गोपनीय माहिती वगळता इतर माहिती चव्हाण यांना पोलिसांनी दिली आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांचे म्हणणे काय?
यासंदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना सांगितलं की, "माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या अपूर्ण माहितीच्या आधारे आलेल्या आहेत. यावर जास्त बोलणार नाही, प्रतिक्रिया देणंही योग्य नाही. यावर योग्य वेळ आल्यावर मी बोलणार आहे." असे चव्हाण यांनी सांगितले होते.
भाजपचे आमदारच पतसंस्थेचे थकबाकीदार
दरम्यान भाजपचे विधान परिषद आमदार चंदूलाल पटेलही अडचणीत आले आहेत. पटेल यांनी 2014-15 साली BHR मधून दोन कोटीचं घेतलले कर्ज प्रकरणही चांगलंच चर्चेत आलं आहे. त्या कर्जावरील व्याजासह रक्कम सध्या 5 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. ह्याच कर्ज प्रकरणात आजी-माजी आमदार साक्षीदार आहेत. तसेच या कर्ज प्रकरणात एका व्यक्तीच्या नावाने सही आणि अंगठा घेतल्याबाबतचाही घोळ असल्याची चर्चा आहे.
BHR कडून सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी कोट्यवधींच कर्ज घेतल्याचं बोललं जात आहे. धनदांडग्यांकडून पैसे वसूल केले तर सामान्य ठेवीदारांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आता व्यक्त होते आहे. फक्त राजकीय हत्यार म्हणून BHR घोटाळ्याचा वापर न होता ठेवीदारांना न्याय दिला पाहिजे, अशी भावनाही व्यक्त होते आहे.