काँग्रेस 'तुकडे-तुकडे' गँगची लीडर - पंतप्रधान मोदी
X
देशाचे विभाजन करणारा काँग्रेस पक्ष देशातील तुकडे तुकडे गँगचे नेतृत्व करत आहे, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये काँग्रेसने लॉकडाऊन असतानाही परराज्यातील लोकांना मोफत तिकीट देऊन महाराष्ट्रातून बाहेर काढले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तसेच काँग्रेस आपल्याच कर्तृत्वामुळे १०० वर्षे सत्तेबाहेर राहणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. पण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या काळात भर उन्हात शेकडो किलोमीटर पायी चालणाऱ्या मजुरांचा उल्लेख मात्र केला नाही. काँग्रेससह विरोधकांनी कोरोनाचे केवळ राजकारण केले, अशीही टीका केली. कोरोनामुळे नरेंद्र मोदी यांची प्रतिमा धुळीला मिळेल, याची वाट विरोधक पाहत होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
यावेळी विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदींच्या आरोपावर आक्षेप घेतला. तसेच पंतप्रधान मोदींनी बेरोजगारी, महागाईवर बोलावे अशी मागणी केली आहे. पण पंतप्रधान मोदी यांनी व्होकल फॉर लोकलचा आपण आग्रह धरत असल्याने काँग्रेस आक्षेप का घेत आहे, असा सवाल उपस्थित केला. कोरोना संकट काळात देशातील काही नेते आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बदनामी करत होते, अशी टीकाही मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केली. काँग्रेसची सध्याची वागणूक ही १०० वर्ष सत्तेत येणार नाही, अशा मानसिकतेमधून सुरू असल्याची टीकाही त्यांनी दिली. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात पंडीत नेहरु यांच्या भाषणांचा आधार घेत काँग्रेसवर टीका केली.
पण अदानी-अंबानी यांचे सरकार या टीकेला मोदी यांनी उत्तर दिले. पंडित नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्या सरकारला टाटा-बिर्लाचे सरकार अशी टीका त्यावेळी विरोधक करत होते. काँग्रेसने त्यांच्याशी सत्तेत भागीदारी केली, पण त्यांचे आरोप करण्याची सवय देखील घेतल्याची टीका मोदींनी केली.