#PegasusSnoopgate –हाच का नवा भारत?, काँग्रेसचा संसदेत सवाल
X
पिगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून राहुल गांधी, आणखी काही विरोधी नेते, पत्रकार, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवली गेल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही यावरुन जोरदार गदारोळ झाला आहे. विरोधकांनी याप्रकऱणी चौकशीची मागणी सुरू केली आहे. या गदारोळामुळे राज्यसभा 12 वाजेपर्यंत आणि लोकसभा 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
अधिवेशऩाचे कामकाज सुरू होण्याआधी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमके आणि राष्ट्रीय जनता दलाची बैठक झाली. या बैठकीत संसदेत सरकारला पिगॅसस प्रकरणावरुन जाब विचारण्याचा निर्णय़ घेण्यात आला. पिगॅसिस किंवा इतर स्पायवेअरद्वारे काँग्रेसने कुणावर पाळत ठेवल्याचे कधी कुणी ऐकले आहे का, पण ही नवीन भारत तयार करण्याची सरकारची रणनीती असल्याची टीका काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.
दरम्यान या मुद्द्यावर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी सोमवारीच सरकारची भूमिका स्पष्ट करत निवेदन दिले आहे. पण तरीही विरोधकांना या मुद्द्यावर चर्चा करायची असेल तर त्यांनी योग्य मार्गाने तशी मागणी करावी, सरकार चर्चेला तयार आहे, अशी प्रतिक्रिया संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.