Home > Politics > 'एमपीएससी' च्या तीन रिक्त पदांवरील नियुक्तीची अधिसूचना जारी

'एमपीएससी' च्या तीन रिक्त पदांवरील नियुक्तीची अधिसूचना जारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. देवानंद बाबुराव शिंदे, डॉ. प्रताप रामचंद्र दिघावकर आणि राजीव रणजीत जाधव यांची या अधिसूचनेनुसार नियुक्ती करण्यात आली आहे.यानंतर भरतीप्रक्रियेला वेग येणार असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.

एमपीएससी च्या तीन रिक्त पदांवरील नियुक्तीची अधिसूचना जारी
X

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त पदांवरील नियुक्तीला मान्यता देण्याबाबत काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मागणी केली होती. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी मागणी मान्य करत तीन सदस्यांच्या नेमणुकीच्या अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. देवानंद बाबुराव शिंदे, डॉ. प्रताप रामचंद्र दिघावकर आणि राजीव रणजीत जाधव यांची या अधिसूचनेनुसार नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत बोलतांना राज्यमंत्री भरणे म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (496 पदे), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा (1 हजार 145 पदे), महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा परीक्षा (435 पदे), महाराष्ट्र वनसेवा परीक्षा (100 पदे), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा (16 पदे) असे एकूण 2 हजार 192 पदांसाठी एकूण 6 हजार 998 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र झालेले आहेत. त्यापैकी 377 उमेदवारांच्या मुलाखती देखील झाल्या आहेत तर उर्वरित 6 हजार 621 उमेदवारांच्या मुलाखती होणे बाकी आहे. आता या सदस्य नियुक्तीमुळे या भरतीप्रक्रियेला वेग येईल. तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.



केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या वाढवण्याच्या अनुषंगानेही राज्यपाल कोश्यारी यांच्यासोबतच राज्यमंत्री भरणे यांनी बैठकीत चर्चा केली. आयोगाच्या एक सदस्यांचा कार्यकाल लवकरच पूर्ण होत असून त्यांची रिक्त होणारी जागा भरण्यासाठी देखील लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल असं भरणे यांनी सांगितले. हे दोन्ही प्रस्ताव प्राप्त झाल्यावर त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही राज्यपालांनी सांगितल्याचे भरणे यांनी म्हटलं आहे.

Updated : 6 Aug 2021 11:58 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top