विधानसभा अध्यक्षपदी निवड होणार नाही असे नितीन राऊत यांना का वाटले?
X
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पक्षाने अनसूचित जाती सेलच्या अध्यक्षपदावरुन हटवले आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल ऐववेळी झालेल्या गोंधळामुळे हायकमांड नितीन राऊत यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांना हटवले गेले असेही सांगण्यात येत आहे. तर आता नितीन राऊत यांना मंत्रीपदावरुन हटवून विधानसभा अध्यक्ष केले जाईल अशीही चर्चा आहे. पण या चर्चेवर नितीन राऊत यांनी मौन सोडले आहे.
"विधानसभा अध्यक्षपदी माझी निवड होणार नाही असं मला वाटतं आहे, कारण की जेव्हा महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी झाली तेव्हापण असाच काही संदर्भ सुरू होता पण मला मंत्री केलं."
अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली आहे. नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव काँग्रेस हायकमांडने चांगलाच मनावर घेतला आहे. काँग्रेसने यासंदर्भात विदर्भातील काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना दिल्लीत बोलावून घेतलं होतं. या तीन बड्या नेत्यांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत, कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांचा समावेश होता. काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या दालनात झालेल्या बैठकीत नितीन राऊत आणि सुनील केदार यांना काँग्रेसच्या शिर्षस्थ नेतृत्वाने समज दिल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं होतं.
त्यानंतर आता काँग्रेस हायकमांडनं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना चांगलाच दणका दिला आहे. नितीन राऊत यांच्याकडून अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष पद काढून घेण्यात आले आहे. आता ही जबाबदारी माझी आमदार राजेश लिलोठीया यांच्याकडे देण्यात आली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी माहिती दिली आहे. काँग्रेसने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, राजेश लिलोठीया यांच्याकडे अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदाची तर के. राजू यांच्याकडे अनुसूचित जाती, ओबीसी, अल्पसंख्यांक आणि अखिल भारतीय आदिवासी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.