फडणवीस यांच्यावर स्वप्नातही विश्वास ठेऊ नका, अनिल गोटे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे. त्यामध्ये फडणवीस यांच्यावर विश्वास ठेऊ नका, असा सल्ला दिला आहे. वाचा काय आहे अनिल गोटे यांचं संपुर्ण पत्र....
X
माननीय एकनाथ शिंदे साहेब,
आपली मुख्यमंत्री पदावर निवड झाल्याबद्दल मी यापूर्वीच हृदयापासून अभिनंदन केले. मोगँबो खुश हुआ. तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे अनुभवलेत म्हणून वडीलकीचा सल्ला देतो. मानला तर आपलाच फायदा होईल. किमान फसवणूक व नंतर पश्चाताप होणार नाही. ही एक लाख टक्के खात्री देतो.( )
देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका ! मी कुठलाही स्वार्थ, काडी ईतकी लाभाची अपेक्षा ठेवली नाही. या नीच, हलकट, पाताळयंत्री, दगलबाज, कपटी, खोटे बोलण्याचे अनन्यसाधारण अंगभूत गुण असलेल्या माणसावर श्रद्धा ठेवली. विश्वास ठेवला. हा माणूस चुकून सुध्दा दगलबाजी करणार नाही, असे मला वाटले होते.
मी त्यावेळी भाजपचा आमदार होतो. ते मुख्यमंत्री होते. रात्री दहा वाजेपासून दोन वाजे पर्यंत सलग चार तास चर्चा केली. मी स्वतःहून म्हणालो साहेब तुम्हाला काही अडचण असेल तर मोकळेपणाने सांगा. मी स्वतःहून बाजूला होतो. हा हलकट लबाड म्हणतो कसा 'गोटेसाहेब तुम्ही पक्षाचे अॅसेट आहात. तुम्हाला मी शब्द नव्हे वचन देतो. उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत जाहीर करतो.'
ठरल्या प्रमाणे पत्रकार परिषदेत जाहीर केले. मी स्वतः भेटून आभार मानले, मला शुभेच्छा दिल्या. कुठलीही सभ्य सुसंकृत खानदानी व्यक्ती एखाद्या व्यक्तीने एवढे सर्व सांगितल्यावर अविश्वास दर्शवेल कसा ? मी प्रामाणिकपणे व एका निष्ठेने वागत आलो. स्वर्गीय वसंतराव भागवत, स्वर्गीय रामभाऊ गोडबोले अशा ऋषीतुल्य व्यक्तींचे संस्कार असल्याने व त्यांच्या देवरदुर्लभ सहवासामुळे तसेच दिलेला शब्द प्राण गेला तरी बेहत्तर पण तसूभरही मागे न हटणाऱ्या माननीय नितीन गडकरी साहेबांनी अत्यंत संकटकाळी दिलेल्या आधाराच्या पाश्वर्वभूमीवर माझ्या मनात शंका येवूच कशी शकेल ?
स्वर्गीय नानासाहेब उत्तमरावांनी तर सलग तीस वर्ष पुत्रवत प्रेम केले. स्वर्गीय प्रमोद महाजन, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी धाकट्या भावाप्रमाणे सांभाळले. कधी शब्द खाली पडू दिला नाही. कधी तर तोंडातून शब्द उच्चारण्यापूर्वीच मनकवडे असल्याप्रमाणे ओळखत !.
स्वर्गीय बाळासाहेबांना लहर आली की, माझ्या दोन मुलांसह भेटायला बोलवत असत. अनेकदा आग्रहपूर्वक बरोबर जेवायला बसवत. माननीय उद्धवजी साक्षीदार आहेत.
मी एक लहान कार्यकर्ता ! मी त्यांना मदत तरी काय करणार ? साहेब तर, जाम खूष असत. अनेकदा प्रेमाने रागवत! किती दिवस अस कफल्लक राहशील? शिवसेनेत ये. तुझ्या आयुष्याचं सोनं करुन टाकतो. मला बाकी काही नकोच होतं. प्रेमाची भूक भागविली जात होती. मणी नावाचे एक पी. ए . होते. साहेबांनी त्यांना सांगीतलं आत्ताच्या आत्ता पत्रकारांना बोलवा "आज या गोट्याला, सोडायच नाही" असे म्हणाले.
पण साहेबांच्या प्रेमा शिवाय मला काही नकोच होत. माननीय मनोहर जोशी सर यातील काही प्रसंगाचे साक्षीदार आहेत. तेलगी प्रकरणातून तब्बल चार वर्षानंतर बाहेर आलो. पहिला फोन कै. गोपीनाथ मुंडे साहेबांचा! दुसरा बाळासाहेबांचा, तिसरा नितीनजींचा ! साहेबांनी तर सौ. हेमा, मुलगा तेजस यांना आवर्जून जेवायला बोलवल !
मी हे सगळं यासाठी सांगितल की, आभाळाएवढ्या उंच उंच व्यक्तीनी मला दिलेला विश्वास, प्रेम आणि आपुलकी कुठे ? आणि फडणविसांची दगलबाजी कुठे ? आजही मनोहर जोशी सरांना विचारा सर्व संधी उपलब्ध असतांना कधी एका तांबड्या पैशाची मदतीची अपेक्षा केली का ?
देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना माझा काडीचाही त्रास नसतांना त्यांच्याइतपत हलकट, नीच, लबाड, धोकेबाज व भ्रष्ट दुराचारी मित्रांचा आत्मा संतुष्ट करण्यासाठी माझ्या सारख्या धनगर समाजातील कार्यकत्याचा छळ केला.
मनाचा तका क्षुद्र की आपल्याकडून अनवधानाने का होईना पण अन्याय झाला, हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा त्यांच्याकडे नाही. अशा राक्षसी वृत्तीच्या व्यक्तीपासून सावध रहावे अशी मनोमन भावना असल्याने आलेला अनुभव शेअर केला. परमेश्वर अशा पशुतुल्य राक्षसी संकटापासून आपले रक्षण करो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
मानलात तर आपला मित्र,
अनिल गोटे