गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग अयशस्वी, सेना-राष्ट्रवादीची युती
X
महाराष्ट्रात सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गोव्यामध्येही देखील सोबत लढले पाहिजे, अशी भूमिका आम्ही मांडली पण काँग्रेसने कोणताच प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. गोव्यामध्ये बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने युती जाहीर केली आहे. "काँग्रसेने सोबत येण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, पण त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. काँग्रेसला एकटं लढायचे असेल असे दिसेत, त्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत युती करुन लढण्याचा निर्णय घेतल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. पण हे दोन्ही पक्ष किती जागांवर लढणार आहेत, ते अजून ठरलेले नाही, अशीही माहिती पटेल यांनी दिली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना बऱ्यापैकी जागांवर लढतील आणि त्या जिंकून किंग मेकर ठरतील असा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला. "काँग्रेसला स्वबळावर लढायचे असेल तर त्यांनी खुशाल लढावे, त्यांना शुभेच्छा. पण आम्ही काही जागांवर लढणार आणि त्यातील बहुतांश जागा जिंकून आमच्या पाठिंब्याशिवाय सरकार बनणार नाही अशी परिस्थिती असेल" असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. शिवसेना-राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी गुरूवारी प्रसिद्ध होईल, असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.