Home > Politics > नवज्योतसिंह सिद्धू पंजाब कॉंग्रेसचे नवे कॅप्टन, 'बाहुबली' अमरिंदर सिंह गटाचे काय?

नवज्योतसिंह सिद्धू पंजाब कॉंग्रेसचे नवे कॅप्टन, 'बाहुबली' अमरिंदर सिंह गटाचे काय?

नवज्योतसिंह सिद्धू पंजाब कॉंग्रेसचे नवे कॅप्टन, बाहुबली अमरिंदर सिंह गटाचे काय?
X

सध्या पंजाब कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रदेश कॉंग्रेसची कमांड सोपविण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह आणि सिद्धू यांच्यात सुरु असलेल्या अंतर्गत वाद आता थांबेल, आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या कॉंग्रेसच्या तयारीलाही चालना मिळेल.

दरम्यान सिद्धू यांच्यासह चार कार्यकारी अध्यक्षांची नेमणूक करून कॉंग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाने सर्व गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे, दुसरीकडे, प्रादेशिक आणि जातीय समीकरणे तयार करण्यासाठी देखील प्रयत्न केले गेले आहेत.

संगतसिंह, सुखविंदरसिंह डॅनी, पवन गोयल आणि कुलजितसिंह नागरा यांना कार्यकारी अध्यक्षांची कमान देण्यात आली आहे. म्हणजेच आता हे स्पष्ट झालं आहे की, कॅप्टन अमरिंदर सिंह हे पंजाबचे मुख्यमंत्री राहतील आणि नवज्योतसिंग सिद्दू हे प्रदेश कॉंग्रेसचे 'कॅप्टन' असतील.

एकाच वेळी समीकरण सोडविण्याचा प्रयत्न...

पंजाब कॉंग्रेसची नवीन टीम पाहता असं लक्षात येतं की, कॅप्टन गटातील नेते बाजूला पडले आहेत. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने पंजाबमधील तीन मुख्य क्षेत्र व प्रमुख जाती वर्गाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे.

पंजाब कॉंग्रेसच्या नव्या संघात दोन कार्यकारी अध्यक्ष मालवा प्रातांत तयार करण्यात आला आहेत. त्याचवेळी हिंदू वर्गाचा चेहरा म्हणून पवन गोयल यांचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे कुलजित नागरा यांना शिख समाजाचा चेहरा म्हणून जागा मिळाली आहे. तर सुखविंदरसिंग डॅनी दलित कोट्यातून या संघात प्रतिनिधित्व करीत आहेत आणि संगत सिंह यांना ओबीसी कोट्यातून कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आलं आहे.

सिद्धू 30 आमदारांना भेटले होते. त्यानंतर गेम पालटला आणि मॅच सिधुंच्या हाती गेली. ३० आमदारांशी मिळून सिद्धू यांनी राजकीय समीकरण तर बदललेच पण वरच्या नेतृत्वावर दबाव सुद्धा आणला. दरम्यान अमृतसर पासून पटियाला पर्यंत त्यांचे समर्थक आनंद साजरा करत असल्याचं समजतंय.

पण 'पिक्चर' अभी बाकी है क्या ?

गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योतसिंह सिद्धू यांच्यात वाद सुरू आहे. दोघांच्या समर्थकांमध्ये दुफळी पाहायला मिळत आहे. नवज्योतसिह सिद्धू यांनी नुकतीच दिल्लीत प्रियंका गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. आणि तेव्हापासूनच त्यांना पक्षाचे पंजाब अध्यक्ष बनवण्याची चर्चा सुरू झाली.

सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्याच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती आणि असे म्हटले होते की, निवडणुकांपूर्वी अशा प्रकारच्या फेरबदलामुळे पक्षाचे नुकसान होईल.

अशा परिस्थितीत कॅप्टन अमरिंदर सिंह आणि त्यांचे समर्थक आता गप्प बसतील का? हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच राजकीय तज्ज्ञ मात्र, कॅप्टन शांत झाल्याचे मान्य करत नाहीत. त्यांच्या मते, दोघांमधला तणाव इतका लांब गेला आहे की, तिथून परत येणं कठीण आहे. त्यामुळे पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं काहीसं वातावरण पंजाब काँग्रेसमध्ये असल्याचं म्हंटल जात आहे.

Updated : 19 July 2021 12:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top