शिंदे गटातील नेता आणि केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा वाद पेटला
X
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर गट आणि भाजप यांची युती झाली आणि सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये सारं काही आलबेल असल्याचा दावा करत आहेत. मात्र आता शिंदे गटातील प्रमुख नेते दीपक केसरकर आणि राणे कुटुंबातील जुना संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. नारायण राणे आणि दीपर केसरकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे.
दीपक केसरकर यांनी आपल्या मर्यादा ओलांडू नये असा इशारा नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी दिला आहे. दीपक केसरकर यांनी कुठेतरी बोलताना नारायण राणे यांची मुलं लहान आहेत, असा टोला लगावल्याची चर्चा आहे. त्यावर संतापलेल्या निलेश राणे यांनी आधी एक ट्विट केले आहे, त्यामध्ये त्यांनी "दीपक केसरकर 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका" असा टोला लगावला होता. त्यानंतर निलेश राणे यांनी एक व्हिडिओ देखील ट्विट करत केसरकर यांना इशारा दिला आहे.
दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा. pic.twitter.com/LARj8cVLoO
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 13, 2022
शिंदे गटात गेल्याने केसरकर यांना जीवदान मिळाले आहे, नाहीतर केसरकरांचे राजकीय जीवन आम्ही संपवले होते, त्यामुळे त्यांनी आपल्या मर्यादांमध्ये रहावे, असा इशारा राणे यांनी दिला आहे. "दीपक केसरकर आपण युतीमध्ये आहोत हे लक्षात ठेवा, इज्जत मिळते आहे ती घ्यायला शिका" असे देखील निलेश राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान दीपक केसरकर यांनी दिल्लीमध्ये निलेश राणे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. "निलेश राणे हे वारंवार उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात, भाजपकडून ठाकरे घराण्यावर कोणीही टीका करणार नाही. असं आमच ठरलं आहे, त्यांनी दहावेळा टीका केली तर मी दहा वेळा बोलणार, माझ्या वयाच्या निम्म्या वयाची राणे यांची मुलं आहेत. म्हणून त्यांना लहान म्हणण्याचा मला अधिकार आहे. त्यांना कोकणी जनतेने त्यांची यापूर्वीच लायकी दाखवली आहे." असा टोला त्यांनी लगावला आहे.