नाना पटोले हे सुधीर तांबे यांच्या संपर्कात? नवा खेळ रंगणार
X
काँग्रेस पक्षाच्या नीलंबनानंतर धुळ्यात माजी पदवीधर आमदार सुधीर तांबे यांनी नाना पटोलेंशी चर्चा झाली असल्याचे स्पष्ट केल्याने खरंच काँग्रेस पक्षाच्या निलंबनाच्या कारवाईनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुधीर तांबे यांच्या संपर्कात आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधीर तांबे हे आज धुळ्यात आले असताना शहरातील शिक्षक भवन येथे कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सुधीर तांबे यांचा काल वाढदिवस असल्याने शिक्षक आणि पदवीधरांच्या नियोजित बैठकीवेळी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना सुधीर तांबे म्हणाले की, 'मी पुन्हा एकदा सांगतो, मी असो अथवा सत्यजित असो आम्ही कोणतीही चूक केलेली नाही, ठीक आहे राजकारण असतं, राजकारणात काही डावपेच चालू राहतात, हा राजकारणाचा भाग असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.
यापुढे बोलताना ते म्हणाले की, काही गोष्टी अचानकपणे घडलेल्या आपल्याला वाटतात, परंतु त्या ठिकाणी आपण काहीही चुकीचं केलेलं नाही. मी आणि सत्यजित ने काहीही चुकीचं केलेलं नसल्याचे म्हणत, मतदारांच्या अपेक्षांना आपण पूर्ण उतरणार असल्याची ग्वाही यावेळी सुधीर तांबे यांनी दिली. सुधीर तांबे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले असून, दुसरीकडे काँग्रेस पक्षाने केलेल्या निलंबनानंतर देखील सुधीर तांबे यांनी धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याच्याचे विधान केले.
त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या निलंबनानंतर देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुधीर तांबे यांच्या संपर्कात आहेत का? हाच महत्त्वाचा प्रश्न यांच्या वक्तव्यामुळे उपस्थित झाला आहे. नाना पटोले यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर लवकरच आपली राजकीय भूमिका देखील जाहीर करण्याचे स्पष्टीकरण सुधीर तांबे यांनी दिले आहे. यामुळे या निवडणुकीतील पुढील कोणता खेळ मतदारांना पाहायला मिळतो हे पाहणं महत्वाचे असणार आहे.