शरद पवार यांच्या नाराजीवर नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया
X
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेली स्वबळाची भाषा आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या टीकेवरुन शरद पवार नाराज असल्याची चर्चा आहे. आता चर्चेवर नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे. शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांकडे नाना पटोले यांच्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे, अशी चर्चा आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील, मंत्री अशोक चव्हाण आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नाना पटोले हे तिथे उपस्थित नव्हते.
शरद पवारांची नाराजी?
काँग्रेसला स्वतंत्र लढायचे असेल त्यांनी आधीच सांगावे म्हणजे आम्हालाही तशी तयारी सुरू करता येईल, तसा निर्णय दिल्लीमधून घेतला गेला असेल किंवा नाना पटोले यांना अधिकार देण्यात आले आहे का तसेही स्पष्ट करावे, या शब्दात शरद पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नाना पटोले यांचे शरद पवारांना उत्तर
यासंदर्भात मुंबईत नाना पटोले यांना पत्रकारांनी विचारले तेव्हा, काँग्रेस नेते आणि शरद पवार यांच्या बैठकीची आपल्याला माहिती नव्हती. शरद पवारांनी आपल्याला तिथे बोलावले नव्हते. पण काँग्रेस नेत्यांना बैठकीतबाबत विचारले तेव्हा ओबीसी आरक्षणाच्या विषयावर ही बैठक होती, असे त्यांनी सांगितल्याचे नाना पटोले म्हणाले. पण शरद पवारांनी आपल्याला का बोलावले नाही, त्यांचा तुमच्यावर राग आहे का, असा सवाल पत्रकारांनी विचारला तेव्हा, नाना पटोले यांनी सांगितले की, आपला वैयक्तिक कुणाशीही वाद नाहीये. आपण कुणावर रागवलेलो नाही. आपण पक्षाचे काम करत आहोत आणि त्याचा कुणाला राग येत असेल तर आपण त्यात काही करु शकत नाही, असे उत्तर नाना पटोले यांनी शरद पवारांनी दिले आहे.