'आगं आगं म्हशी मला कुठं नेशी' शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीवरून मनसेची खोचक टीका
X
राज्यसभा निवडणूकीपाठोपाठ देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी चालू केली आहे. त्यातच राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे. त्यावरून मनसेने संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.
देशात राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीवरून राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. त्यातच राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे. मात्र शरद पवार यांनी आपण राष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार नाही, अशी भुमिका घेतली आहे. त्यापार्श्वभुमीवर मनसेने राष्ट्रवादीवर खोचक टीका केली आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, शरद पवार यांचे नाव वारंवार राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी घेतलं जात आहे. मात्र शरद पवार वारंवार नाही नाही असं म्हणत आहेत. त्यामुळे शरद पवार यांचे नाव पुढे करून त्यांचे नाव चर्चेत आणणारांनाच राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायची आहे. म्हणजेच आगं आगं म्हशी मला कुठं नेशी अशा पध्दतीची त्यांची भुमिका आहे का?अशी शंका मनात उपस्थित होत आहे, असा टोला संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना लगावला.
आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. तसेच शिवसैनिकांकडून राज ठाकरे यांना अयोध्या दौरा करता आला नाही. त्यावर टीका होत आहे. यावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, नारायण राणे ज्यावेळी शिवसेना सोडून गेले होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात फक्त राज ठाकरे हे प्रचार करत होते. बाकी सगळे बिळात लपून बसले होते. त्यामुळे हिंमतीच्या गोष्टी आम्हाला शिकवू नये आणि अशा सेटींग केलेल्या दौऱ्याबाबत आम्हाला सांगूच नये, असा टोलाही आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावरून लगावला.