राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करत मनसेच्या राज्य सचिवाचा राजीनामा
X
मशिदींवरील भोंग्यांवरुन घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरे यांच्यावर अनेक स्तरातून टीका होते आहे. पण आता मनसेला वसंत मोरे यांच्या पाठोपाठ आणखी एका पदाधिकाऱ्याने घरचा आहेर दिला आहे. मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी राजीनामा दिला आहे. इरफान शेख यांनी राज ठाकरे यांच्या मुस्लिमविरोधी धोरणाला विरोध करत आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या पत्रात काय म्हटले आहे ते पाहूया..
" मी पक्ष स्थापनेपासून आपल्या सोबत कार्य करीत आहे. पक्षाच्या अनेक आंदोलनात सामील होऊन अनेक केसेस अंगावर घेतल्या. २००८ च्या मराठी पाट्यांचा आंदोलनात मला पोलिसांनी अटक करून संपूर्ण अंग हिरवे निळे करेपर्यंत मारहाण केली त्या वेळी आपणच मला म्हणाला होता की या जखमा विसरू नको, बाकी मी बघतो साहेब आता बघायला हे दिवस मिळाले एका बाजूने समाजात कुचंबणा दुसरीकडे पक्षात अस्थिर वातावरण. माझ्या सारख्या आर्थिक परिस्थिती नसलेल्या कार्यकर्त्यांने आता कुठे आणि कोणाकडे भावना सांगाव्या? माझा राजीनामा मी खूप जड अंतकरणाने आपल्याला सोपवत आहे.
साहेब आज माझ्या कुटुंब आणि समाज यापुढे मी हतबल आहे. ज्या कुटुंबातील व्यक्तींनी मला आपल्या सोबत काम करण्याची प्रेरणा दिली तेच आज तुमची साथ सोडण्याची सूचना करत आहे. १६ वर्षात आजच आपल्याला अजान, मशीद, मदरसे यांच्यावर अचानक संशय आला. आम्ही तुमच्या सोबत असतांना तुम्ही आम्हाला का नाही या गोष्टी बोललात आम्ही याचा सोक्षमोक्ष आपल्या समोर केला असता.
साहेब आपण आपल्या बाजूने चुकला नसाल ही, पण आमच्या बाजूने अवश्य काही तरी भयंकर घडणार याचा प्रत्यय येत आहे. तरी आपण भी दिलेला राजीनामा स्वीकारावा. गेलेला काळ आणि आपले संबंध मी विसरू शकणार नाही परंतु येणाऱ्या काळात आपण काही तरी चांगले या देशासाठी आणि राज्यासाठी कराल ही सदिचा आणि भावना आहे.
जय महाराष्ट्र.....!
•आपला सहकारी"
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करत घेतलेल्या भूमिकेवरुन आता राजकारण तापले आहे. तर मनसेमध्येही याचे पडसाद उमटू लागले आहेत, असे दिसते.