रिफायनरीबाबत मनसेने भूमिका केली स्पष्ट
बारसू गावात रिफायनरी नको, असं म्हणत कोकणवासीयांनी आक्रोश केला. त्यानंतर अखेर राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली.
X
नाणार येथे होणारा प्रकल्प बारसू गावात हलवण्यात आला. मात्र बारसू गावातील नागरिकांनीही या प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यातच बारसू गावात पोलिसांनी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्याचे संतप्त पडसाद उमटताना दिसत आहेत. त्यापार्श्वभूमीवर मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली.
मनसे नेते नितीन सरदेसाई म्हणाले, कोकणाच्या विकासासाठी कोकणात प्रकल्प यायला हवेत. मात्र स्थानिकांशी चर्चा करून प्रकल्प यायला हवेत. स्थानिकांना विश्वासात घेतलं पाहिजे. त्याबरोबरच राज ठाकरे हे 6 मे रोजी रत्नागिरीत सभा घेणार आहेत. त्यावेळी ते आपली भूमिका स्पष्ट करतील.
कोकणात पर्यटनाचा विकास व्हायला हवा. त्याबरोबरच काजू आणि आंबा हे कोकणातील महत्वाची फळं असल्याने त्यावर प्रक्रीया उद्योग निर्माण व्हायला हवेत, असंही नितीन सरदेसाई म्हणाले.
उदय सामंत यांनी रिफायनरीबाबत मांडली भूमिका
उदय सामंत म्हणाले की, कोकणातील नाणार ऐवजी हा प्रकल्पा बारसू गावात व्हावा, यासंदर्भात उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले होते. त्यामुळे ही जागा उध्दव ठाकरे यांनीच सुचवली असल्याचे स्पष्ट केले. त्याबरोबरच शरद पवार यांनी मला फोन केला होता. ते देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मांडलेली भूमिका मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोच करील आणि हा प्रकल्प होण्यासाठी त्यांचेही सहकार्य घेतले जाईल, असंही उदय सामंत म्हणाले.
पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, कोकणातील जनता साधी भोळी आहे. या जनतेला बाहेरचे लोक भडकवत आहेत. मात्र या शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी शासन नक्की घेईल.