विधानपरिषद निवडणूक: चित्रा वाघ यांचा पत्ता कट करणारा नेता कोण?
X
राज्यात 5 विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे.
भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये एकाही महिलेला संधी देण्यात आलेली नाही. खरंतर भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता होती. त्याचं नाव भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित झाल्याचं देखील बोललं जात होतं. मात्र, अचानक कुठं माशी शिंकली आणि त्यांचा पत्ता भाजपने कट केला.
चित्रा वाघ यांनी मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचार तसेच महिलांच्या संदर्भातील अनेक प्रश्न घेऊन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्याचं काम केलं. महिलांच्या प्रश्नावर त्या नेहमीच आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. माजी मंत्री संजय राठोड यांच्या प्रकरणात चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी हे प्रकरण शेवटपर्यंत लावून धरले होते.
राज्यात महाविकास आघाडी सरकारला या ना त्या कारणावरुन त्या सातत्याने धारेवर धरत आल्या आहेत. यामुळेच चित्रा वाघ यांना उमेदवारी दिली जाईल. हे निश्चित मानलं जात होतं. मात्र, चित्रा वाघ यांना डावलून या जागेवर राजहंस सिंह यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळं चित्रा वाघ यांचं नाव निश्चित झालेले असताना वाघ यांचा पत्ता कोणत्या नेत्याने कट केला? असा सवाल या निमित्ताने राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
दरम्यान भाजपने कोल्हापूर, नागपूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबई अशा पाचही जागांवरील उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र, उमेदवारांचा विचार केला तर भाजपने आयारामांना संधी दिल्याचे दिसत आहे. कारण, 5 पैकी 3 उमेदवार हे काँग्रेसमधून आलेले आहेत.
धुळे-नंदुरबार मतदारसंघातून उमेदवार अमरिश पटेल, मुंबईतून संधी मिळालेले उमेदवार राजहंस सिंग आणि कोल्हापूर मतदारसंघातून तिकीट मिळालेले अमल महाडिक हे तिघेही मूळ काँग्रेसचे नेते आहेत.
दरम्यान भाजपने मुंबईतून राजहंस सिंह, कोल्हापूरातून अमल महाडिक, धुळे-नंदुरबारातून अमरीश पटेल, नागपूरातून चंद्रशेखर बावनकुळे,अकोला-बुलडाणा-वाशिम मतदार संघातून वसंत खंडेलवाल यांना संधी देण्यात आली आहे.