आमदार निलेश लंके यांची ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपीकास मारहाण?
आमदार निलेश लंके यांनी ग्रामीण रूग्णालयातील कनिष्ठ लिपीक राहुल पाटील यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे. याबाबत वैद्यकीय अधीक्षकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र देखील लिहीले आहे.
X
पारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांनी सुरू केलेल्या टाकळीढोकेश्वर येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदीर या कोवीड सेंटरमुळे राज्यातच नाही तर देशात त्यांची चर्चा सुरू झाली. त्या कोवीड सेंटरमधील त्यांच्या विनामास्क फिरण्यावरून देखील त्यांच्यावर जोरदार टीका झाली. दरम्यान आमदार लंके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
आ. निलेश लंके यांनी ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपीकास लसीकरणाचे टोकण विकत असल्याचा आरोप करत मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात चर्चेला उधाण आलं आहे. बुधवार रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही मारहाण पारनेरचे गटविकास अधिकारी किशोर माने आणि पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासमोरच झाल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात पारनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांना पत्र देखील दिले आहे.
ज्या पत्रात वैद्यकिय अधीक्षकांनी म्हटले आहे की, पारनेर ग्रामीण रुग्णालयात बुधवारी रात्री साडेआठ वाजता तहसीलदार आणि डॉ.अडसुळ यांच्या आदेशाने लसीच्या लाभार्थ्यांना टोकणचे वाटप करण्यात आले. मात्र, रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमार आमदार लंके व डॉ. कावरे यांनी टोकण वाटप करणारे कनिष्ठ लिपीक राहुल पाटील यांना बोलावून घेत, त्यांच्यावर टोकण विकण्याचा आरोप केला आणि राहुल पाटील यांना मारहाण केली.
दरम्यान या घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी त्यांनी आपल्या , पत्रात केली आहे. या पत्राची प्रती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, तहसिलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक बळप यांना देखील पाठवण्यात आली आहे. दरम्यान आ. नीलेश लंके यांच्याकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
मारहाण झाली नाही ; लिपिकाचा खुलासा
दरम्यान राहुल पाटील यांनी आपल्याला कोणीही मारहाण केलेली नाही. मारहाणीची बातमी चुकीची आहे. आमदार लंके यांनी केवळ आपल्याला समज दिल्याचं म्हटलं आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ प्रसारीत केला आहे.
दरम्यान आता पाटील यांनी जो खुलासा केला त्यानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण मिळण्याची शक्यता आहे. राहुल पाटील यांच्यावर कुणाचा दबाव आहे का? मारहाण झाली नाही तर वैद्यकिय अधीक्षकांनी पत्र का पाठवले? या प्रकरणाची चौकशी होणार का? हे आणि असे अनेक प्रश्न आता अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना पडले आहेत.