...आणि अजित पवारांनी डोक्यावर हात मारून घेत, कार्यकर्त्यांचे कान टोचले
X
अहमदनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आज अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे संत श्रेष्ठ निळोबाराय यांच्या अभंग गाथेच्या दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन संपन्न झाले.
दरम्यान यावेळी संत निळोबाराय यांचे निवासस्थान असलेला वाडा आणि मंदिर याचा जीर्णोद्धार होणार असल्याने या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. भूमिपूजनाचे औचित्य साधून प्रचलित पद्धतीप्रमाणे कोनशिलेचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार , आणि मान्यवरांनी केले. मात्र, कोनशीलेवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुश्रीफ या नावांमध्ये झालेल्या शाब्दिक चूक चाणाक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवून देत कपाळावर हात मारून घेतला.
या कोनशीलेवर मुश्रीफ या शब्दांऐवजी मुस्त्रिफ असं लिहिण्यात आलं होतं. ही चूक अजित पवार यांनी उपस्थितांना दाखवून दिली. अशा चुका करत जाऊ नका असं आपल्या खास शैलीत त्यांनी सुनावलं. त्यामुळे अजित पवारांचा चाणक्षपणा पुन्हा समोर आला. त्यांनी कार्यकर्त्यांना एक प्रकारे ती समज दिली, त्याबद्दल उपस्थित असलेले कार्यक्रमाचे आयोजक आणि संबंधित चांगलेच चपापले. यावेळी उपस्थित असलेले राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील गालात हसले!