आता तुम्हाला सतरंज्या उचलायला लावणार, इम्तियाज जलील यांनी डोगली तोफ
X
राज्याच्या राजकारणात रोज नवनविन वाद पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत. आज एकीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधानसभेतील गट नेते पदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी थेट आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना सतरंज्या उचलाव्या लागतील, अशी वेळ आणून दाखवेन, असा इशारा दिला आहे.
राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत असताना आज एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांवर टिकास्त्र सोडले आहे. एमआयएमसोबत असलेली युती तोडून वंचित बहुजन आघाडीने शिवसेना ठाकरे गटासोबत घरोबा केला. एमआयएमनेही महाविकास आघाडीसोबत येण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी इम्तियाज जलील सेल्युलर अर्थात धर्मनिरपेक्ष बनले तर त्यांचे पक्षात स्वागत करु, असे वक्तव्य केले होते. यावर इम्तियाज जलील यांनी धर्मनिरपेक्षतेची तुमची आणि माझी व्याख्या यात खूप फरक असल्याचे सांगितले. आणि यापुढे तुमचे नेते शरद पवार यांच्या बाजूला बसायची माझी ताकत असल्याचे सुद्धा यावेळी जलील म्हणाले.
इम्तियाज जलील एमआयएमसारख्या पक्षातून निवडून येतो आणि तुम्ही म्हणता की, हा कट्टरतावादी आहे. तर याला धर्मनिरपेक्षता म्हणायची का? असा सवाल जलील यांनी उपस्थित केला. तर तुमचे नेते लोकसभा- विधानसभेत जाणार आणि आमच्या पक्षाचे नेते महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये अडकून पडणार, हे आता चालणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राजेश टोपे खुर्चीवर बसले आणि इम्तियाज जलील सतरंजीवर बसले असे वाटत असेल तर ते दिवस आता गेल्यामध्ये जमा आहे. त्यामुळे आगामी काळात तुम्हालाही सतरंज्या उचलाव्या लागतील, अशी वेळ आणून दाखवेन, असा थेट इशारा इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.
त्याचप्रमाणे तुम्ही आणि तुमचे वरिष्ठ नेते लोकसभा-राज्यसभेवर जाणार आणि आम्ही स्थानिक पातळीवरच राहणार ही धारणा आता तुमच्या डोक्यातून काढून टाका, असा आपुलकीचा सल्ला जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना दिला आहे. त्याचप्रमाणे मी मुस्लिम समाजात एक विश्वास निर्माण केला असल्याचे जलील यांनी यावेळी सांगितले. माझी कोणत्याही पातळीवर जाऊन आव्हान देण्याची तयारी असल्याचे सुद्धा इम्तीयाज जलील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.