Home > Politics > मला प्रभारी मुख्यमंत्री करा, शेतकऱ्याचे राज्यपालांना पत्र

मला प्रभारी मुख्यमंत्री करा, शेतकऱ्याचे राज्यपालांना पत्र

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात सत्तेचे महानाट्य चालू आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकार कोसळणार की एकनाथ शिंदे यांचे बंड शमणार याविषयी तर्क वितर्क लावले जात आहे. दरम्यान बीडच्या युवकाने थेट राज्यपालांना पत्र लिहून मला प्रभारी मुख्यमंत्री पदी नियुक्त करा, अशी मागणी केली आहे.

मला प्रभारी मुख्यमंत्री करा, शेतकऱ्याचे राज्यपालांना पत्र
X

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधातच बंड केले आहे. तर आपल्याकडे अपेक्षित संख्याबळ असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे राज्यातील प्रश्नांकडे लक्ष नसल्याने मला मुख्यमंत्री करा, अशी मागणी बीड जिल्ह्यातील शेतकरी युवकाने राज्यपालांना पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

काय आहे पत्रात?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) या गावातील श्रीकांत गदळे या युवा शेतकऱ्याने राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगामुळे मला मुख्यमंत्री करा, अशी मागणी राज्यपालांना पत्र पाठवून केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, मी 10 ते 12 वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात अग्रेसर आहे. शेतकरी, गोरगरिबांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करीत आहे. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याठिकाणचा शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे. परंतू सरकारने तात्काळ मदत करणे अपेक्षित होती. परंतू ती मदत मिळाली नाही. तसंच मुख्यमंत्री यांनी आडिच वर्ष सत्तेत राहून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. राज्यावर नैसर्गिक आपत्ती कोसळली असताना सत्तेत राहून कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना करणअयात आली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू अथवा प्रभारी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती न देता मला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून संधी द्यावी, अशी मागणी श्रीकांत गदळे या शेतकऱ्याने केली आहे.




पुढे श्रीकांत गदळे यांनी पत्रात म्हटले आहे की, मी जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लावेन. बेरोजगारी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार या सर्वांना न्याय देण्याचे काम करीन. विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण माझी तात्काळ नियुत्ती करावी ही विनंती, असे या पत्रात लिहीले आहे.

बीड जिल्ह्यातील श्रीकांत गदळे या युवा शेतकऱ्याने थेट राज्यपालांना पत्र लिहून प्रभारी मुख्यमंत्री पदी नियुक्ती करण्याची मागणी केल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Updated : 24 Jun 2022 10:23 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top