Home > Politics > संजय राऊत यांचे मोठे विधान, राज्यात पुन्हा सत्तांतर झाले तर….

संजय राऊत यांचे मोठे विधान, राज्यात पुन्हा सत्तांतर झाले तर….

संजय राऊत यांचे मोठे विधान, राज्यात पुन्हा सत्तांतर झाले तर….
X

राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर झाले तर आश्चर्य वाटायला नको असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारीवर देखील त्यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्याभरातील ५ वी दिल्ली वारी आहे. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वारंवार दिल्लीला गेले नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली दौऱ्यावर यावं लागलं नाही, दिल्लीचे लोक मुंबईत येऊन शिवसेनेशी चर्चा करत होते, युती करण्यासंदर्भात अमित शहा मातोश्रीवर आले होते, असाही टोला त्यांनी लगावला आहे.

त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराला होत असलेल्या विलंबाबत बोलताना त्यांनी मोठे विधान केले आहे. मंत्रिमंडळाची स्थापना अद्याप होऊ शकलेली नाही, दोघांचं कॅबिनेट बेकायदेशीर निर्णय घेत आहे, असा आरोही त्यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयामध्ये संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निर्णय घेणार नाहीत, याची आम्हाला खात्री असल्यामुळे १६ आमदार अपात्र ठरतील, असा दावा त्यांनी केला. तसेच त्यांना कुठल्यातरी पक्षात विलीन व्हावं लागेल. मग ते स्वतःला शिवसैनिक कसे म्हणून घेणार, असा सवाल त्यांनी बंडखोर आमदारांना विचारला आहे.

जर बंडखोर गटाला दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागले तर अशा परिस्थितीत पक्षातील किती आमदार दुसऱ्या पक्षात जायला तयार होतील, असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर झालं तर आश्चर्य वाटायला नको असे विधान केले आहे. तसेच संसदेतील गदारोळ आणि खासदारांच्या निलंबनावरुनही त्यांनी जोरदार टीका केली आहे.

Updated : 28 July 2022 10:50 AM IST
Next Story
Share it
Top