Home > Politics > राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार ठरला? सुधीर मुनगंटीवार यांचे संकेत

राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार ठरला? सुधीर मुनगंटीवार यांचे संकेत

राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार ठरला? सुधीर मुनगंटीवार यांचे संकेत
X

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार जवळपास महिनाभर लांबला होता. त्यानंतर विस्तार झाला पण त्यामध्ये केवळ २० जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यामुळे दुसरा मंत्रिमंडळ कधी होणार याची चर्चा आहे आणि इच्छुकांना देखील त्याबाबत प्रतिक्षा आहे. पण अजून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावर कोणतीही माहिती दिलेली नाही. पण आता ज्येष्ठ मंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत संकेत दिले आहेत.

राज्याच्या मंत्रिमंडळात आणखी 23 मंत्र्यांची भर पडू शकते, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या तुलनेत 15 टक्के सदस्यांना मंत्री करता येते. त्यानुसार राज्यात एकूण 43 मंत्री करता येऊ शकतात, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. सध्या शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात 20 मंत्री आहेत. त्यात आणखी 23 मंत्र्यांची निवड केली जाऊ शकते. तसेच हा विस्तार येत्या काही दिवसात लवकरच होऊ शकतो, अशीही माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.

शिंदे आणि ठाकरे गटातील वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्याबाबत घटनापीठाकडे अजून सुनावणी झालेली नाही. त्यामुळे शिंदे सरकारपुढील संकट कायम आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा कधी असा सवालही आता उपस्थित होतो आहे. पण आता सुधीर मुनगंटीवार यांनी लवकरच विस्तार होणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान शिंदे गटातील नाराज आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल असेही संकेत आमदार शहाजीबापू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते.

Updated : 2 Sept 2022 12:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top