बंडखोर आमदारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊत यांची पलटी
बंडखोर आमदारांबाबत संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले होते. त्यावरून आज अखेर पलटी मारली आहे.
X
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. त्यातच संजय राऊत यांनी दहिसर येथे बोलताना बंडखोर आमदारांना आव्हान देत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून वाद निर्माण झाल्याने संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यावरून पलटी मारली आहे.
एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केले आहे. त्यामुळे सरकार टिकणार की तरणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तर संजय राऊत यांनीही शिंदे गटाच्या आमदारांना आव्हान दिले होते. त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर संजय राऊत यांनी पलटी मारली आहे.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, दहिसर येथील भाषणाचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. त्यामध्ये मी जे बोललो ती आपल्या बोलण्याची पध्दत आहे. त्यात मी म्हणालो की, जे लोक गुवाहटीमध्ये आहेत. त्यांचा आत्मा मेला आहे.आता फक्त त्यांचे शरीर जीवंत आहे. त्यांना जिंदा लाशे असं म्हणालो. त्याबरोबरच ते इकडे आल्यानंतर त्यांचे फक्त शरीर येतील मात्र आत्मा कुठं असेल? त्यांचा आत्मा मेला आहे, असं जर मी म्हणालो असेल तर त्यामध्ये एवढं मनाला लावून घेण्यासारखं काय आहे? असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, तुम्ही समजून घेत नाही. जसं तुम्ही महाराष्ट्रातून बाहेर आहात. त्याप्रमाणे तुमचा मराठी भाषेषी संपर्क तुटला आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. तसंच जिंदा लाश हे शब्द राम मनोहर लोहिया यांचे आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले होते?
संजय राऊत म्हणाले होते की, आसाममध्ये कामाख्या देवी आहे. या देवीला रेड्याचा बळी दिला जातो. त्याप्रमाणे महाराष्ट्रातून ४० रेडे पाठवले आहेत. त्यांचा बळी द्या. तसंच ते जीवंत गेले होते. मात्र आता त्यांच्यात आत्मा राहीला नसल्याने ते परत आले तरी आत्म्याविना जीवंत प्रेतं असतील.
बाप बदलण्याच्या वक्तव्यावरही संजय राऊत यांचे स्पष्टीकरण
संजय राऊत यांनी बाप बदलण्यावरून बंडखोर आमदारांवर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी व्हिडीओ ट्वीट करत बाप बदलण्याची भाषा गुलाबराव पाटील यांनी केली होती. ती भाषा बाप बदलणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
पक्षात खातात, पितात, मोठे होतात आणि नंतर आपला बाप बदलतात, असा टोला संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना लगावला. तर बाप बदलण्याची भाषा गुलाबराव पाटील यांची आहे माझी नाही, असं संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे हे आजही आमचे जवळचेच
संजय राऊत यांना उदय सामंत हे तुमचे अत्यंत जवळचे होते. त्यावर बोलताना संजय़ राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे आठ दिवसातून एकदा आमच्या घरी यायचे. चहापाणी व्हायचं. एकमेकांचे सुखदुख वाटले जायचे. ते आजही आमच्यासाठी जवळचे आहेत. तसंच दीपक केसरकर, उदय सामंत यांच्यासह गुवाहटीतील सर्वच जण आमचे जवळचे आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.
ही लढाई कायद्याची
संजय़ राऊत म्हणाले की, दोन्ही बाजूने ही कायद्याची आणि रस्त्यावरची लढाई आहे. ही दोन्ही बाजूने लढली जाईल. एवढंच नाही तर यामध्ये कोर्ट निर्णय घेईल. त्याबरोबरच गुवाहटीत प्रलय आला आहे. तुम्ही तिकडे कशाला बसला आहात, असंही संजय़ राऊत म्हणाले.
शिंदे गट हिंमतवान
संजय राऊत म्हणाले की, शिंदे गट हा खूप हिंमतवान आहे. त्यांच्यासाठी केंद्रीय यंत्रणा सुरक्षा पुरवत आहेत. ते सुरतमार्गे गुवाहटीला गेले. ही मोठी हिंमत आहे. मात्र तरीही महाराष्ट्राचे पोलिस तुमचं संरक्षण करायला समर्थ आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर
एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून म्हटले होते की, ज्यांचे संबंध दाऊदसोबत आहेत. त्यांच्याशी सत्तेत कसं बसायचं असंही एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले की, ज्यांचे मेहबुबा मुफ्ती यांच्याशी संबंध आहेत आणि ज्यांचा पुलवामा हल्ल्याशी संबंध आहे. त्यांच्याशी सत्ता कशी स्थापन करायची, असंही संजय राऊत म्हणाले.