विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव?
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सरकार कोसळणार का? अशी चर्चा रंगली आहे. त्यापार्श्वभुमीवर शिंदे गट राष्ट्रवादीला मोठा दणका देण्याच्या तयारीत आहे.
X
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तासंघर्ष आणखी तीव्र झाला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्यासह बारा आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली. तर यावर एकनाथ शिंदे यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे आता थेट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यातच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना एकनाथ शिंदे यांनी भारत गोगावले यांच्या प्रतोद पदाचा ठराव पाठवला होता. तो नरहरी झिरवळ यांनी फेटाळून लावला. त्यामुळे राज्यात विधानसभेत संघर्ष पेटणार आहे. दरम्यान विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणता येतो का?
यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने ज्येष्ठ पत्रकार नागेश केसरी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, विधानसभाध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी अधिवेशन सुरू असावे लागते. तसंच विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी सबळ कारण द्यावे लागते. तसंच सभागृहात संख्याबळ सिध्द करावे लागेल, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार नागेश केसरी यांनी दिली.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे टेक्निकल उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणणे शक्य नाही, असं मत मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना नागेश केसरी यांनी सांगितले