बंडखोर मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचा दणका, खाती काढली
X
एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचा मोठा दणका, सर्व बंडखोर मंत्र्यांची खाते काढले, वाचा कोणत्या मंत्र्याचं कोणतं खाते कोणाकडे? एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधातच बंड केले आहे. मात्र सहा दिवसानंतर या बंडखोर मंत्र्यांची खाती का काढण्यात येत नाहीत? असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बंडखोर मंत्र्यांना दणका दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जे बंडखोर मंत्री आहेत त्यांच्यावर मुख्यमंत्री का कारवाई करत नाहीत? असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यापार्श्वभुमीवर जनतेची कामं अडकून पडू नयेत म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आता बंडखोर मंत्र्यांची खाती काढले आहेत.
राज्यात सध्या पावसाळा सुरू असल्याने अतिवृष्टी, आपत्ती यासारख्या घटना घडत असतात. त्यामुळे या विभागांची कामं सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी जे मंत्री सध्या राज्यात अनुपस्थित आहेत. त्या पाच मंत्री आणि चार राज्यमंत्र्यांकडील खाती इतर मंत्र्यांकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे हा शिंदे गटातील मंत्र्यांना मोठा दणका मानला जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कार्यनियमावलीतील नियम 6 अ नुसार अनुपस्थिती, आजारपण आणि इतर कोणत्या कारणांमुळे आपली कामं पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल, असा नियम आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे
कोणत्या मंत्र्यांची खाती कोणाकडे?
एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. तर मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग ही खाती अनिल परब यांच्याकडे, दादाजी भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खातं आणि संदिपान भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. तर कालपर्यंत उध्दव ठाकरे यांच्यासोबत असलेले उदय सामंत काल शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे
कॅबिनेट मंत्रीपदासोबतच शंभूराज देसाई यांच्याकडील गृहराज्यमंत्रीपद संजय बनसोडे तर विश्वजीत कदम यांच्याकडे वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन ही खाती वर्ग करण्यात आले आहेत. याबरोबरच सतेज पाटील यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क हे खाते वर्ग करण्यात आले आहे.
शिंदे गटासोबत असलेले राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे असलेले सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभागाचे राज्यमंत्रीपद विश्वजीत कदम यांच्याकडे तर प्रसाद तनपुरे यांना वैद्यकीय शिक्षण व वस्रोद्योग तसंच सतेज पाटील यांना अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री आणि आदिती तटकरे यांच्याकडे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री पद देण्यात आले आहेत.
अब्दुल नबी सत्तार यांच्याकडे असलेले महसूल राज्यमंत्री प्रसाद तनपुरे यांच्याकडे तर सतेज पाटील यांच्याकडे ग्रामविकास राज्यमंत्रीपद तर आदिती तटकरे यांच्याकडे बंदरे, खार जमीनी विकास व विषेष सहाय्य राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे अपक्ष आमदार मंत्री होते. त्यांच्याकडे असलेले शालेय शिक्षण राज्यमंत्रीपद आदिती तटकरे, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास आणि कामगार राज्यमंत्रीपद सतेज पाटील, संजय बनसोडे यांच्याकडे महिला व बालविकास राज्यमंत्रीपद तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे इतर मागास बहुजन कल्याण राज्यमंत्रीपद वर्ग करण्यात आले आहे. मात्र हा खातेबदल शिंदे गटाला मोठा दणका मानला जात आहे.