राज्यात 'ED' सरकार, विश्वासदर्शक ठरावात सरकार पास
शिंदे फडणवीस सरकारची अग्निपरीक्षा पार पडली.
X
महाविकास आघाडी सरकार बरखास्त झाल्यानंतर राज्यात ED सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने आपली पहिली परीक्षा सहज पास केली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वास दर्शक ठराव भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार मांडला. त्यावरील मतदान शिरगणती स्वरुपात झाले. यामध्ये शिंदे-भाजप सरकारच्या बाजूने १६४ मतं पडली. तर महाविकास आघाडीच्या बाजूने ९९ मतं पडली.
या मतदाना दरम्यान महाविकास आघाडीची ८ मतं कमी झाली आहे. यामध्ये काँग्रेसचे काही आमदार उशिरा पोहोचल्याने त्यांना विधिमंडळात प्रवेश नाकारण्यात आला. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक भाजपचे राहुल नार्वेकर यांनी १६४ मतांनी जिंकल्यानंतर सरकार विश्वास दर्शक ठराव सहज जिंकेल असा दावा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. दरम्यान विश्वास दर्शक ठरावावेळी बंडखोर आमदार शिंदेंसोबत काय राहतात का, याबाबत उत्सुकता होती. पण सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत काय राहिल्याचे दिसते आहे. याउलट शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे, रविवारपर्यंत शिवसेनेसोबत असलेले आमदार संतोष बांगर यांनी रात्रीतून आपला गट बदलला आणि तेसुद्धा शिंदे गटाला जाऊन मिळाले.
दुसरीकडे शिवसेनेने आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित केला. पण अध्यक्षांनी तो प्रस्ताव पटलावर आधीच असल्याचे सांगत सुनिल प्रभू यांना बोलण्याची परवानगी नाकारली. यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.