उद्धव ठाकरे यांचे आव्हान, हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा
X
शरद पवार यांनी राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेले सरकार जास्त दिवस टिकेल असे वाटत नाही, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.
भाजपमध्ये हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. शिवसेना भवन इथे राज्यातील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांशी संवाद साधला.
पक्षात जे बंड झाले आहे, त्यानंतर लढायचे असेल तर सोबत राहा असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे. भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे असा आरोपही त्यांनी केला.
कोणताही खेळ खेळण्यापेक्षा मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पण जर तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल असा इशारा त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांना दिला.
विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान, असा आरोपही त्यांनी केला आहे. सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी घटनातज्ज्ञांना केले आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याबाबत सर्वाना सत्य बोलू द्या, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.