Home > Politics > मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
X

एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील जनतेला थोडा दिलासा मिळणार आहे. राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर हिरकणी गाव वाचवण्यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली.

आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी आपली उद्धव ठाकरे यांच्यावरील नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही शिवसैनिकांची कामं होत नव्हती, त्यांच्यावर खोट्या आरोपांखाली कारवाई होत होती, असा आरोप करत त्यांनी आपल्या बंडाचे कारण सांगितले.

आता आपण कामाची पद्धत बदलणार असून तपासून अहवाल सादर करा असा शेरा न देता थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून आदेश देणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर पुढच्या निवडणुकीत बंडखोर आमदार पडणार अशी टीका करणाऱ्यांना त्यांनी उत्तर दिले. सर्व ५० बंडखोर आमदार निवडून आणणार नाही तर गावी शेती करण्यासाठी निघून जाणार असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. तसेच पुढच्या निवडणुकीत भाजप आणि आमचे असे एकूण २०० आमदार निवडून आणू असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

आपल्या विभागाच्या कामात अजित पवारांसह अनेक नेते हस्तक्षेप करत होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. एवढेच नाही तर शिवसेना-भाजपा युतीसाठी पाचवेळा उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो होतो, पण उपयोग झाला नाही, असेही त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा मलाच मुख्यमंत्री करण्याचे ठरले होते, पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मी नको, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा, अशी भूमिका घेतली, पण आपण काहीही बोललो नाही, आपल्याला सत्तेची हाव नाही असे सांगत शिंदे यांनी आपली नाराजी हिंदुत्वासाठी आणि शिवसेनेसाठीच होती, असा दावा केला.

Updated : 4 July 2022 5:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top