उ.प्रदेश निवडणुकीत संयुक्त किसान मोर्चा भाजपविरोधात उतरणार
X
संयुक्त किसान मोर्चाने आता उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप विरोधात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र केले जाणार आहे, तसेच थेट भाजपविरोधात भूमिका घेतली जाईल, अशी घोषणा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टीकेत यांनी केली आहे. संयुक्त किसान मोर्चाने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे शेतकरी महापंचायत रविवारी पार पडली. या महापंचायतीमध्ये राकेश टिकैत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश ऐवजी गुजरातमधून निवडणूक लढवावी असे आव्हान देखील टीकेत यांनी दिले. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचंड नाराजी असल्याने त्यांचा गुजरातमध्ये देखील पराभव होईल असा टोला देखील त्यांनी लगावला. हरियाणामध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या लाठीमारानंतर आता संयुक्त किसान मोर्चाने भाजप विरोधात थेट भूमिका घेत निवडणुकीत धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे. तसेच 27 सप्टेंबर रोजी या लाठीमाराच्या निषेधार्थ भारत बंदची घोषणा देखील केली आहे.
मोदी सरकार या देशाची संपत्ती विकत आहे, महागाई वाढली आहे, पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच सरकारने संपूर्ण देशच विकायला काढल्याने आता मोदी सरकार विरोधात उतरण्याचा निर्धार या महा पंचायतीमध्ये व्यक्त करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी सरकार विरोधात उतरला तर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपपुढे मोठे आव्हान निर्माण होणार आहे.