घोटाळे उघडकीस आणणाऱ्यालाच अटक, किरीट सोमय्या यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला
X
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि महाविकास आघाडी सरकारमधील संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. किरीट सोमय्या यांना कराड रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोमय्या यांनी कराडमध्येच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचे सत्रच किरीट सोमय्या यांनी सुरू केले आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर सोमंय्या सोमवारी कोल्हापूरला जाणार होते. पण कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी त्यांना जिल्हाबंदी केली. त्यानंतर सोमय्या यांना कराड स्टेशनवरच ताब्यात घेण्यात आले. यानंतर सोमय्या यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच घोटाळे उघडकीस आणणाऱ्या व्यक्तीला अटक केली जात आहे, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करु दिली जात नाहीये, आपल्याला कोणत्या आदेशांर्तगत गणेश विसर्जन करण्यापासून रोखले गेले, कार्यालयात कोंडून ठेवण्यात आलं ते सांगावे, असे आव्हान त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे. ठाकरे सरकार ठोकशाही सरकार आहे, आपल्याला मुंबईत मला धक्काबुक्की करुन ट्रेन मिळू नये यासाठी प्रयत्न केले गेले, असा आरोप त्यांनी केला. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आपण ईडीकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्यावर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात हायकोर्टात धाव घेणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.