किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत संघर्ष अखेर कोर्टात
X
भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यातील संघर्ष अखेर कोर्टात पोहोचला आहे. किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी मुंबई हायकोर्टात संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. १०० कोटी रुपयांचा हा दावा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांना माफी मागावी लागेल, असा दावा किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आता माफी कशी मागायची याची तयारी केली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आम्हाला कोणताही पैसा नकोय, संजय राऊत यांनी मानहानीच्या दाव्यातील पैसे धर्मादाय संस्थांना द्यावे, पण माफी मागितली पाहिजे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. आपल्याला उद्धव ठाकरे यांना धडा शिकवायचा आहे, असाही इशारा सोमय्या यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण?
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर टॉयलेट घोटाळ्याचा आरोप केला होता. मिरा भाईंदर शहरातील 16 सार्वजनिक टॉयलेट बांधण्याचे काम मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते, पण यासाठी त्यांनी खोटी कागदपत्रे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतही हा मुद्दा मांडला होता. यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर संजय राऊत यांनी याच प्रकरणाच घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याच आरोपानंतर किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांनी आता कोर्टात धाव घेत मानहानीचा दावा दाखल केला आहे.
Medha Kirit Somaiya filed Rs100 Crore Defamation Suit against Shivsena Sanjay Raut today Mumbai High Court.
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 23, 2022
मेधा किरीट सोमैयानी आज मुंबई उच्च न्यायालय येथे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर 100 कोटींचा दिवाणी मानहानीचा दावा दाखल केला @BJP4India pic.twitter.com/UFlwVIwxz1