Home > Politics > एकनाथ खडसे यांना ईडीने सोडलं तर जल्लोषात स्वागत करू: गिरीश महाजन

एकनाथ खडसे यांना ईडीने सोडलं तर जल्लोषात स्वागत करू: गिरीश महाजन

एकनाथ खडसे आणि गिरिश महाजन यांचा वाद टोकाला...

एकनाथ खडसे यांना ईडीने सोडलं तर जल्लोषात स्वागत करू: गिरीश महाजन
X

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यातील वाद आता पुढच्या टप्प्यात पोहोचला आहे. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांचं नाव न घेता मास्तर च्या मुलाकडे बाराशे कोटींची संपत्ती असल्याचा आरोप केला होता. आता खडसे यांच्या आरोपांना महाजन यांनी उत्तर दिलं आहे.

रॉकेल टाकून फटफटी चालवणाऱ्या खडसे यांच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली. त्याचे पुरावे द्या. ईडीच्या तावडीतून सुटले तर खडसेंचं जल्लोषात स्वागत करू असं प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी दिलं आहे.

या आरोप प्रत्यारोपाच्या खेळात खडसे महाजन वाद आता विकोपाला पोहोचल्याचं दिसून येत आहे. एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून त्यांच्या कडे लक्ष देण्याची गरज असल्याचा सल्लाही महाजन यांनी यावेळी दिला आहे.

खडसेंकडे आता बोलायला काहीच नसल्याने कोणताही आधार नसताना बेछूट आरोप करत आहेत. CD असेल तर दाखवा असं आवाहन खडसेंना करत महाजन यांनी केलं, खडसें भंपक घाणेरडे विधान करत आहे. त्यांच्या जिभेला हाडच नाही. असा संताप देखील महाजन यांनी व्यक्त केला आहे.

एका खोट्या गुन्ह्यात अडकवून माझ्या विरुद्ध मोक्का लावण्यासाठी फिरत असल्याचा आरोपही यांनी खडसेंवर केला आहे. काल पासून सुरू झालेला खडसे महाजन यांच्या वक्तव्या वरून दोघात वाद सुरू झाला आहे. खडसे यांनी काय आरोप केले आणि त्याला महाजन यांनी कसा पलटवार केला

गिरीश महाजन यांच खडसेंना उत्तर - माझ्याकडे कितीही मालमत्ता आहे, याची चौकशी करा. तुमचे सरकार आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुमचे वजन आहे, मग तुमच्या नेत्यांना सांगून माझी चौकशी करा, अशा शब्दांत महाजन यांनी खडसेंना खुले आव्हान दिले.

दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा स्वतःकडे बघा, तुम्ही स्वतः जिल्ह्यातील जनतेला सांगत होता की, मी रॉकेल टाकून मोटारसायकल फिरायचो. मग एवढी संपत्ती आली कुठून. तुमच्या नावाचे एवढे उतारे कसे झाले, याचीही माहिती जनतेला द्या. ईडी आता तुमची चौकशी करत आहे. मग त्या चौकशीला सामोरे जा, ईडीला आवश्यक ती कागदपत्रे सादर करून दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना. कशाला इकडे तिकडे पळत फिरताय, म्हणत चिमटा काढला आहे.

आपल्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी खडसे अशा प्रकारे बेछूट आरोप करताय, तुम्ही खरोखर निर्दोष असाल तर आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. खडसे यांचे आता मुक्ताईनगरमध्ये काय अस्तित्त्व राहिले आहे, कोथळी ग्रामपंचायतीत 7 सदस्य आहेत, त्यातही त्यांचे बहुमत नाही. सरपंच दुसराच आहे. स्वतःच्या मतदारसंघात मुलीचा सपाटून पराभव झाला.

राष्ट्रवादीत आमदार होता आले नाही, ही सल त्यांच्या मनात आहे. म्हणूनच त्यांचा सतत तोल जात आहे. आमच्यावर खंडणीसारखे खोटे गुन्हे दाखल करायला लावण्यामागे खडसे यांचा हात असल्याचा आरोपही गिरीश महाजन यांनी केला.

एकनाथ खडसे यांनी काय म्हटले होते?

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने अटक केल्याच्या चर्चेला गेल्या तीन दिवसांपूर्वी उधाण आले होते, मात्र काल एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी बोलतांना मनातील खदखद पुन्हा बाहेर काढली.

आपला आता ईडीचा काहीही संबंध राहिला नसल्याचा दावा खडसे यांनी केला होता. ईडीच्या चौकशी बाबत न्यायालयात खटला दाखल केला असल्याने न्यायालय अटक करत असेल किंवा काही करत असेल... न्यायालय जो निर्णय देईल त्यावर पुढे काय ते होईल असा दावा केला आहे, यावेळी आपल्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या विरोधकांवर एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली होती

माझं नाव बदमान करण्यासाठी विरोधक जिवाच रान करत असून नाथाभाऊ ची ताकद माहिती असल्याने विरोधक अशा प्रकारचे कृत्य करत असल्याचा आरोप या वेळी एकनाथ खडसे यांनी केला आहे.

माझ्या बाप जाद्यांनी संपत्ती करून ठेवली आहे. माझे स्वतःचे घर वाडे होते. त्याचे पुरावे आहेत. मात्र, ज्याचे वडील मास्तर होते. त्यांनी हजार बाराशे कोटींची संपत्ती जमवली. त्यांची चौकशीची मागणी केली आहे. ती का होत नाही? असा सवाल करत एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला होता.

भाईचंद हिराचंद रायसोनी ( BHR) सोसायटीचा घोटाळा समोर आल्याने विरोधकांचे खरे दुखणे असून त्यामुळे विरोधक माझ्यावर आरोप-प्रत्यारोप करत महाजन यांच्यावर एकनाथ खडसेंनी जोरदार टीका केली होती.

खडसे-महाजन वाद इथेच थांबणारा नाही, दोघांमधील खरी राजकीय लढाई चा अंक आणखी पुढे पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत थेट नाव घेऊन बोलणं दोघे नेते टाळत होते. आता ही लढाई दोघांच्या नावावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता सुरू होतील असं राजकीय विश्लेषकांच म्हणणं आहे.

Updated : 2 Oct 2021 5:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top